अटकेची टांगती तलवार, सीबीआय टीम थेट पी. चिदंबरम यांच्या घरात

सीबीआयची टीम त्यांना (P Chidambaram) अटक करण्यासाठी त्यांच्या घरीही दाखल झाली. पण ते घरात नसल्याने सीबीआय टीमला परतावं लागलं. सीबीआयने पी. चिदंबरम यांच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.

अटकेची टांगती तलवार, सीबीआय टीम थेट पी. चिदंबरम यांच्या घरात

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया (INX Media Case) प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सीबीआयची टीम त्यांना (P Chidambaram) अटक करण्यासाठी त्यांच्या घरीही दाखल झाली. पण ते घरात नसल्याने सीबीआय टीमला परतावं लागलं. सीबीआयने पी. चिदंबरम यांच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.

यापूर्वी दिल्ली हायकोर्टाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळत पी चिदंबरम यांना मोठा दणका दिला होता. विशेष म्हणजे तीन दिवसांची सवलतही देण्यास कोर्टाने नकार दिला. अंतरिम जामीन अर्जाची मुदत संपल्यानंतर आणखी तीन दिवस मिळावेत, अशी मागणी पी चिदंबरम यांनी केली होती. हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पी चिदंबरम सुप्रीम कोर्टात गेले. पण सुप्रीम कोर्टानेही तत्काळ सुनावणीसाठी नकार दिला. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी बुधवारी सुनावणी होऊ शकते.

अंतरिम जामीन अर्जाची मुदत संपल्यानंतर सीबीआय आणि ईडी पी चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक करु शकते. अटकेपासून वाचण्यासाठी पी चिदंबरम आता सुप्रीम कोर्टात गेले आहेत. अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

आयएनएक्स मीडियाला परकीय गुंतवणूक प्रमोशन मंडळाकडून बेकायदेशीर पद्धतीने परवानगी मिळवून देण्यासाठी 305 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. या प्रकरणात चिदंबरम यांना कोर्टाकडून आतापर्यंत जवळपास 24 वेळा अंतरिम जामीन मिळालाय. चिदंबरम अर्थमंत्री असताना 2007 सालचं हे प्रकरण आहे.

या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना यापूर्वीच अटक केली होती, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत. सध्या हत्येच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सरकारी साक्षीदार होण्यास होकार दिल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं.

2017 मध्ये सीबीआयने परकीय गुंतवणूक प्रमोशन मंडळात आढळून आलेल्या बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. तर ईडीने 2018 मध्ये पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आयएनएक्स मीडियाची मालकीन इंद्राणी मुखर्जीला साक्षीदार बनवण्यात आलं आणि जबाबही नोंदवण्यात आला. कार्ती चिदंबरम यांना 10 लाख रुपये दिल्याचं इंद्राणी मुखर्जीने कबूल केल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *