पाकिस्तानच्या कुरघोड्या काही संपेना, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार, एक जण जखमी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला. भारताने पाकिस्तानला कठोर उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे, कुपवाडा येथे समाजसेवकावर झालेल्या गोळीबारात एकाची हत्या झाली आहे. काश्मीर हाय अलर्टवर आहे आणि दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू आहे.

पाकिस्तानच्या कुरघोड्या काही संपेना, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार, एक जण जखमी
pakistan terror attack
| Updated on: Apr 27, 2025 | 10:25 AM

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. भारत सरकराकडून सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द करणे, एकमेकांच्या दुतावासातील अधिकाऱ्यांन देश सोडून जाण्यास सांगणे, अटारी बॉर्डर बंद करणे, व्हिसा रद्द करणे, पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. एकीकडे भारताकडून पाकिस्तानची कोंडी केली जात असताना दुसरीकडे पाकिस्तानाच्या कुरघोड्या काही थांबताना दिसत नाही. रविवारी पहाटेच्या सुमारास जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात समाजसेवक गुलाम रसूल मगरे यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जम्मू काश्मीरमधील कंडी भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी कंडी परिसरात राहणारे समाजसेवक गुलाम रसूल मगरे यांच्या घरी घुसून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्या. यात ते गंभीर जखमी झआले. त्यानंतर मगरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हल्ल्याचा कसून तपास सुरु

कुपवाड्यातील या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा दलाकडून या हल्ल्याचा कसून तपास सुरु आहे. तसेच या घटनेतील दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

जम्मू काश्मीर हाय अलर्टवर

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या जम्मू काश्मीर हाय अलर्टवर आले आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन विदेशी पर्यटकांसह २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. एकीकडे व्हिसा रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक दहशतवाद्यांची घरे देखील जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर प्रशासनाने दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. यातील ८ ते १० दहशतवाद्यांची घरे पाडण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यांच्यावर छापे टाकले जात आहेत. तसेच अनेक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.