“शुद्धीत आल्यावर फक्त रक्ताच्या थारोळ्यात…” पहलगाममध्ये त्यावेळी नेमकं काय घडलं? जखमी पर्यटकाने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. सुबोध पाटील या जखमी झालेल्या एका प्रत्यक्षदर्शीने आपला भयानक अनुभव सांगितला. त्यांना अतिरेक्यांनी गोळीबार केला, त्यांच्या मानेला गोळी लागली.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तसेच यात अनेक पर्यटक जखमी झाले होते. या घटनेतील मृतांमध्ये भारतीय नागरिकांसह परदेशी नागरिकांचाही समावेश होता. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या भारतात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानाला कठोर शब्दात प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी सर्वच भारतीयांकडून केली जात आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारतात तणावाचे वातावरण असले तरी दुसरीकडे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी नवी मुंबईत राहणाऱ्या सुबोध पाटील यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांच्या मानेला गोळी घासून गेल्याने ते जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता उपचारानंतर ते नवी मुंबईतील कामोठे परिसरात असलेल्या घरी परतले आहेत. आता त्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये नेमकं काय घडलं? याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे.
गोळी माझ्या मानेला घासून गेली आणि…
पहलगामच्या बैसरल व्हॅलीमध्ये झालेल्या पर्यटन स्थळावर झालेल्या भ्याड सुबोध पाटील हे जखमी झाले. आता ते उपचार घेऊन आपल्या कामोठे येथील घरी परतले आहेत. यावेळी त्यांनी या भ्याड अतिरेकी हल्ल्यासंदर्भात त्यांच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे. “आम्ही तिथे फिरत असताना अचानक गोळ्यांचा आवाज सुरु झाला. आम्ही बचावासाठी पळू लागलो. त्यावेळी अतिरेकी जवळ येऊन हिंदू कौन है, वो खडे हो जाओ असे म्हणू लागले. तसेच जे कोणी आवाज करत होते, त्यांना थेट गोळ्या झाडत होते. कोणीही उभं राहत नसल्याने अखेर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. तेव्हा एक गोळी माझ्या मानेला घासून गेली. मी तेथेच बेशुद्ध पडलो”, असे सुबोध पाटील म्हणाले.
प्राथमिक उपचारानंतर हेलिकॉप्टरद्वारे आर्मीच्या रुग्णालयात
“मी शुद्धीवर आल्यावर या ठिकाणी सर्वत्र फक्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसत होते. त्यावेळी एका स्थानिक घोडेवाल्याने खांद्यावर उचलून प्रवेशद्वारापर्यंत आणले. तिथे पाणी दिले. त्यानंतर काही स्थानिक मोटार घेऊन आले. त्यांच्या मोटारीमध्ये बसून आम्ही पहलगाम येथे आलो. तिथे प्राथमिक उपचारानंतर हेलिकॉप्टरद्वारे आर्मीच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तेथे पुढील उपचार करण्यात आले”, असे सुबोध पाटील यांनी सांगितले.
