
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. त्यात बांदीपोरा या भागात दोन्ही बाजुंनी तुफान गोळीबार सुरू आहे. सध्या काश्मीरच्या काही भागात 100 हून अधिक दहशतवादी असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान बांदीपोरा भागात सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. तर दोन पोलिसांना गोळी लागली आहे.
पहेलगामनंतर चौथ्यांदा चकमक
पहेलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद यांच्यात धुमश्चक्री उडाली आहे. यापूर्वी गुरूवारी सुरक्षादलांनी उधमपूरमधील डूडू बसंतगडमधये काही दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. या गोळीबारात एक सैनिक शहीद झाला होता. भारतीय लष्कराचे व्हाईट नाईट कॉर्प्स आणि जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून रँक 6 PARA SF चे शिपाई झंटू अली शेख यांना श्रद्धांजली दिली आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना गोळी लागली होती. त्यात ते शहीद झाले.
लष्कर-ए-तैयबाचे चार दहशतवादी अटकेत
दरम्यान पोलिसांनी काल लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांना अटक केली. ते या दहशतवादी संघटनेचे ओव्हर ग्राऊंड वर्कर असल्याचे समोर येत आहे. हे चारही जण पोलीस आणि स्थानिकांवर हल्ला करण्याच्या तयारीने आले होते. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बांदीपोरा भागात शोध मोहिम सुरू केली. त्यांनी विविध परिसर पिंजून काढला. तपासा दरम्यान मोहम्मद रफीक खांडे आणि मुख्तार अहमद डार या दोघांना पकडले. त्यांच्याकडून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. त्यामध्ये चिनी हँडग्रेनेड, एक 7.62 एमएम मॅगजीन आणि 7.62 एमएम बुलेट्सचे 30 राऊंड यांचा समावेश आहे.
उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. त्यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून 2 असॉल्ट रायफल, दारुगोळा, लढण्यासाठीचे सर्व सामान, काडतूस, पाकिस्तानी नोटा, चॉकलेट, सिगरेटचे पॅकेट त्यांच्याकडे सापडले. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निशस्त्र सर्वसामान्य लोकांवर हल्ला केला. या घटनेत 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला.