
हरयाणातील पंचकुला इथं एकाच कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून कारमध्ये आत्महत्या केली. बागेश्वर धाम इथं हनुमान कथेला उपस्थित राहिल्यानंतर हे सर्वजण घरी परतत होते. या धक्कादायक घटनेबाबत आता प्रत्यक्षदर्शी पुनीत राणा यांनी जबाब नोंदवला आहे. ते म्हणाले, “गाडी आमच्या घराजवळच उभी होती. कोणीतरी आम्हाला सांगितलं की बाहेर एक गाडी आहे. त्याच्यावर टॉवेल ठेवला आहे. आम्ही तिथे पोहचून विचारणा केली असता त्यांचा कुटुंबप्रमुख प्रवीण मित्तल यांनी सांगितलं की आम्ही बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला आलो आहोत. आम्हाला हॉटेल सापडलं नाही म्हणून आम्ही गाडीतच झोपलो आहोत.” हे ऐकल्यानंतर प्रत्यक्षदर्शी पुनीत यांनी त्यांना गाडी तिथून काढून दुसरीकडे पार्क करायला सांगितली.
“आम्ही गाडीच्या आत पाहिलं तेव्हा आम्हाला दिसलं की सर्वांनी एकमेकांवर उलट्या केल्या होत्या. अशा परिस्थितीत प्रवीण मित्तल गाडीतून बाहेर पडले. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनीसुद्धा विष घेतलं होतं. आम्ही खूप कर्जात बुडालोय. माझे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत, पण कोणीही मदत केली नाही, असं ते म्हणाले. त्यानंतर मी गाडीमध्ये बसलेल्या मुलांना हलवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही हालचाल करत नव्हतं”, असं पुनीत यांनी पुढे सांगितलं.
पुनीत यांनी घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. तोपर्यंत गाडीमधून खूपच दुर्गंधी येत होती. पोलिसांना गाडीत एक औषधाची गोळीही सापडली होती. प्रत्यक्षदर्शीने पुनीतने असंही सांगितलं की पोलीस लवकर पोहोचले, पण रुग्णवाहिका 40-45 मिनिटांनंतर आली. जर रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर कदाचित लोकांचे प्राण वाचले असते. गाडीतून फक्त प्रवीण जिवंत बाहेर आला होता, परंतु त्यानेही विष प्राशन केल्याने काही वेळानंतर त्याचाही मृत्यू झाला.
या घटनेनंतर प्रवीण मित्तल यांच्या शेजारी राहणाऱ्या आराधना थापा यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. “हे कुटुंब अत्यंत साधं होतं. त्यांची आई आजारी होती. मुलं देहरादूनच्या ब्लूमिंग बर्ड स्कूलमध्ये शिकत होती. सासऱ्यांचं तपकेश्वर मंदिराजवळ दुकान होतं. हे कुटुंब वर्षभरापूर्वी त्यांच्या सासऱ्यांसह चंदीगडला स्थलांतरित झालं होतं. त्याआधी ते कोलागडमध्ये जवळपास तीन वर्ष राहिले होते. पंचकुलामध्ये ते भाड्याने राहत होते”, असं त्यांनी सांगितलं.
पोलिसांना गाडीमधून दोन पानांची एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये असं म्हटलंय की कर्जामुळे कुटुंब दिवाळखोरीत निघालं होतं. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी घेत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यात लिहिलं होतं. मृतांमध्ये एक जोडपं, तीन मुलं आणि त्यांचे आजी-आजोबा यांचा समावेश आहे.