बंगालमध्ये सत्ता येताच PM मोदींची सर्वात मोठी घोषणा! म्हणाले, पहिल्याच कॅबिनेटमध्ये…
PM Modi Big Announcement for Bengal : पश्चिम बंगालमध्ये भाजपने शानदार विजय मिळवला आहे. या यशानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालमधील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे

आज पश्चिम बंगालसह देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. बंगालमध्ये भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या जवळ आहे. या प्रचंड यशानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालमधील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो लोकांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी काय घोषणा केली हे जाणून घेऊयात.
बंगाल भयमुक्त झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, आजपासून बंगाल भयमुक्त झाला आहे. आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. बंगालमध्ये परिवर्तन झाले आहे. बंगालच्या या विजयासाठी हजारो कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना अत्याचार सहन केले आहेत. या कार्यकर्त्यांना त्रासाचा सामना करावा लागला. आज भाजपच्या विजयाचे श्रेय या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देत आहे. हा विजय मी बंगालच्या जनतेला समर्पित करत आहे.
आज नवीन सूर्योदय झाला
पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, बंगालच्या पावन भूमिवर नवीन सूर्योदय झाला आहे. ही अशी पहाट आहे ज्याची अनेक पिढ्यांनी वाट पाहिली आहे. भाजपने जिंकलेल्या जागा हा केवळ आकडा नाही. या विजयाने हिंसा आणि भीतीचे राजकारण मुळापासून उखडून टाकले. आजपासून बंगालच्या भविष्याची यात्रा सुरू झाली, यात विकास, अतुट विश्वास आणि नवी आशा सोबत चालेल. मी आज प्रत्येक बंगालीला आश्वासन देतो ती तुमच्यासाठी भाजप दिवसरात्र एक करेल. रोजगार मिळेल, महिलांना सुरक्षा मिळेल.
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा करताना म्हटले की, पहिल्याच कॅबिनेटमध्ये आयुषमान भारत योजनेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. तसेच घुसखोरांविरोधात कारवाई केली जाईल. आज आम्ही रविंद्रनाथ टागोर यांना नमन करतो, आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करू. भाजप बंगालमध्ये भयमुक्त वातावरण तयार करेल ही मोदींची गॅरंटी आहे. बंगालची निवडणूक एक आणखी कारणामुळे खास आहे. बंगाल निवडणुकीवेळी हिंसा व्हायची आणि निर्दोष लोकांचा मृत्यू व्हायचा. यावेळी बंगालमध्ये शांतीपूर्ण मतदान झाले. निवडणुकीत एकाही निर्दोष नागरिकाचा मृत्यू झाला नाही.
बंगालमधील राजकीय पक्षांना आवाहन
पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, ‘आज बंगालने परिवर्तनाच्या भागात प्रवेश केला आहे. मी बंगालच्या राजकीय पक्षांना आग्रह करतो की, बंगालमध्ये गेल्या दशकात कितीतरी लोकांचे आयुष्य बरबाद झाले. आजपासून निवडणुकीबाबत बिघडलेले वातावरण सुधारले पाहिजे. आज भाजपचा विजय झाला आहे, त्यामुळे बदल झाला पाहिजे. माझी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे ही हिंसाचार संपवून टाकू, सर्वांनी बंगालची सेवा करण्यासाठी सर्वांनी काम करूयात.’