
पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग मध्ये पोहोचले आहेत. या G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवीन उपक्रमांचा प्रस्ताव ठेवला आहे. यावेळी PM मोदींनी जागतिक विकास मापदंडांचा सखोल पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. सर्व समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासावर बोलताना पंतप्रधानांनी, G20 ने जागतिक वित्त आणि विकासाला आकार दिला आहे असे विधान केले आहे.
पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, सध्याच्या मॉडेल्सनी मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला संसाधनांपासून वगळले असून निसर्गाचा अतिरेकी वापर करण्यास प्रवृत्त केले आहे. ही आव्हाने आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. निसर्गाचे अतिरेकी शोषण होते आहे, आफ्रिका याला बळी पडला आहे. आफ्रिका प्रथमच G20 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे आता आपण विकासाच्या मापदंडांचा पुनर्विचार केला पाहिजे. आपण मानव, समाज आणि निसर्गाला एकात्मिक समग्र म्हणून पाहिले पाहिजे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगभरात असे अनेक लोक आणि समुदाय आहेत जे आपल्या पारंपारिक आणि पर्यावरणीय जीवनशैलीचे जतन केले आहे. या परंपरा सांस्कृतिक ज्ञान, सामाजिक एकता आणि निसर्गाबद्दलचा खोल आदर देखील दर्शवतात.
Spoke at the first session of the G20 Summit in Johannesburg, South Africa, which focussed on inclusive and sustainable growth. With Africa hosting the G20 Summit for the first time, NOW is the right moment for us to revisit our development parameters and focus on growth that is… pic.twitter.com/AxHki7WegR
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2025
जगभरातील अनेक लोक आणि समुदाय पर्यावरणीय संतुलित, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रथांचे पालन करतात. याचाच आधार घेत पंतप्रधानांनी G20 अंतर्गत जागतिक पारंपारिक ज्ञान भांडार तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारतीय ज्ञान प्रणाली उपक्रम या व्यासपीठाचा आधार बनू शकतो. हे भांडार पारंपारिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि सामायिकरण करेल. हे ज्ञान भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाईल.
आफ्रिकेचा विकास झाल्यास जागतिक स्तरावर फायदा होईल असं म्हणत पंतप्रधानांनी G20-आफ्रिका कौशल्य गुणक प्रस्ताव सादर केला. या उपक्रमात सर्व क्षेत्रांमध्ये ट्रेन-द-ट्रेनर्स मॉडेलचा अवलंब करण्याची आणि त्याला सर्व G20 सदस्यांकडून पाठिंबा आणि वित्तपुरवठा करण्याची योजना आहे. पुढील दहा वर्षांत आफ्रिकेत दहा लाख प्रमाणित प्रशिक्षक तयार करणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे, ज्यामुळे नंतर लाखो तरुणांना फायदा होईल.
जगात सध्या फेंटानिलसारख्या जीवघेण्या कृत्रिम औषधाचा प्रसार होत आहे, यामुळे सार्वजनिक आरोग्य, सामाजिक स्थिरता आणि जागतिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी ड्रग्ज-दहशतवादाच्या साखळीशी लढण्यासाठी एक विशिष्ट G20 उपक्रमाचा प्रस्ताव ठेवला आहे. या उपक्रमात तस्करी नेटवर्कमध्ये व्यत्यय आणणे, पैशाचे बेकायदेशीर व्यवहार थांबवणे आणि दहशतवादासाठी जाणाऱ्या निधीवर मर्यादा आणणे हा आहे. PM मोदी म्हणाले की, भारत आणि आफ्रिकेतील युती मजबूत आहे. सर्व जागतिक संस्थांमध्ये ग्लोबल साऊथचा आवाज वाढवण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे.