PM मोदींच्या हस्ते छत्तीसगडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन, काय आहे वैशिष्ट्ये?

Shaheed Veer Narayan Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) छत्तीसगडमधील शहीद वीर नारायण सिंह स्मारक-सह-आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन केले. या संग्रहालयाची माहिती जाणून घेऊयात.

PM मोदींच्या हस्ते छत्तीसगडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन, काय आहे वैशिष्ट्ये?
pm modi tribal museum
| Updated on: Nov 01, 2025 | 9:43 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) छत्तीसगडमधील शहीद वीर नारायण सिंह स्मारक-सह-आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन केले. हे संग्रहालय भारतातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना व महान शहीद वीर नारायण सिंह यांना समर्पित आहे. वीर नारायण सिंह यांनी ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारांविरुद्ध लढा दिला होती आणि मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले होते. त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.

या संग्राहालायाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी आतील गॅलरींना भेट दिली. यात वसाहतवादी राजवटीविरुद्ध छत्तीसगडच्या आदिवासी समुदायांच्या वीर संघर्षांचे चित्रण करण्यात आलेले आहे. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री विष्णू देव साई यांचे हा प्रकल्प उत्कृष्टतेने यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले. मोदी म्हणाले की, ‘हे संग्रहालय छत्तीसगडच्या शूर योद्ध्यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचे प्रतिबिंब आहे, यामुळे भविष्यातील पिढ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

संग्रहालयात 14 गॅलरी आणि 650 शिल्पे

या खास संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री साई म्हणाले की, आदिवासी समुदायांच्या गौरवशाली इतिहासाचे, धैर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक असलेले हे स्मारक-सह-संग्रहालय छत्तीसगडच्या लोकांना समर्पित आहे. यात येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या पूर्वजांच्या कथा जतन करण्यात आलेल्या आहेत.

यावेळी प्रधान सचिव सोनमणी बोरा यांनी PM मोदींना संग्रहालयाच्या प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती दिली. बोरा म्हणाले की, 50 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या संग्रहालयात 14 गॅलरीमध्ये सुमारे 650 शिल्पे आहेत. ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासींनी केलेल्या बंडाची माहिती पर्यटकांना देण्यासाठी डिजिटल व्यवस्थाही करण्यात आली आहे.

या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद वीर नारायण सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच “आदि शौर्य” या ई-पुस्तिकेचे प्रकाशन केले आणि शहीद वीर नारायण सिंह यांच्या वंशजांशी संवाद साधला. “एक पेड माँ के नाम” मोहिमेचा भाग म्हणून पंतप्रधानांनी संग्रहालयाच्या परिसरात एक रोपटे देखील लावले.

संग्रहालयाची ठळक वैशिष्ट्ये

  • स्वागत परिसर: थीमची ओळख करून देते. छत्तीसगडच्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे धाडस, बलिदान आणि वारशाची माहिती मिळते.
  • गॅलरी: आदिवासी जीवनशैली आणि मराठा आणि ब्रिटिश शोषणाचे चित्रण.
  • स्वातंत्र्य संग्रामातील लढाया: हलबा क्रांती, सुरगुजा क्रांती, भोपाळपट्टनम क्रांती, परळकोट क्रांती, तारापूर क्रांती, मेरिया क्रांती, कोई क्रांती, लिंगगिरी क्रांती, मुरिया क्रांती आणि गुंडाधुर आणि लाल कलिंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख बंडांचे प्रदर्शन.
  • महिलांचा प्रतिकार: महिलांच्या नेतृत्वाखालील एक अग्रगण्य चळवळ, राणी चो-रिस क्रांती (1878) ची माहिती मिळते.
  • शहीद वीर नारायण सिंह आणि 1857 चा उठाव: ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्धच्या शहीद वीर नारायण सिंह यांच्या बंडाचा आणि छत्तीसगडच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांच्या हौतात्म्याची माहिती देण्यात आलेली आहे.
  • स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग: ध्वज सत्याग्रह आणि जंगल सत्याग्रहाची माहिती मिळते. महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळींमध्ये आदिवासींच्या सहभागावर प्रकाश टाकते.
  • स्मारक क्षेत्र: आदिवासी प्रतिकाराच्या शिखराचे आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचे प्रतीक असलेले शहीद वीर नारायण सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करते.

 

Follow Us