PM Modi on India Pakistan Conflict : न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही, पंतप्रधान मोदींनी पाकला दमच भरला
ऑपरेशन सिंदूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं, यावेळी बोलताना त्यांनी आता न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही म्हणत पाकिस्तानला इशारा दिला आहे.

भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आहे, यावेळी बोलताना आता इथून पुढे न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही म्हणत त्यांनी पाकिस्तानला इशारा देखील दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मोदी?
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक खतरनाक दहशतवादी ठार झाले, दहशतवाद्यांचे अनेक आका गेल्या तीन दशकापासून पाकिस्तानात जाहीरपणे फिरत होते. भारताविरोधात साजिश रचत होते. भारताने एका झटक्यात त्यांचा खात्मा केला.
जेव्हा पाकिस्तानकडून याचना केली गेली. पाकिस्तानकडून जेव्हा सांगितलं गेलं की त्यांच्याकडून यापुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही. सैन्य गोळीबार होणार नाही. त्यावर भारताने विचार केला. आम्ही सध्या ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केलं आहे, येत्या काळात आम्ही पाकिस्तान काय भूमिका घेतो कसा वागतो हे पाहणार आहोत, असा इशारा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारताचे तिन्ही दल, बीएसएफ, अर्ध सैनिक दल सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाच्या विरोधात भारताचं हे धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आता नवीन लाईन खेचली आहे. पहिली म्हणजे, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर थेट उत्तर देणार. आमच्या पद्धतीने आमच्या अटीवर उत्तर देत राहणार. प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई करणार, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवण्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांकडून न्युक्लिअर युद्धाच्या पोकळ धमक्या देखील देण्यात आल्या. यावर बोलताना मोदी यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे, कोणतंही न्युक्लिअर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या आडून वाढणाऱ्या दहशतवादी ठिकाण्यावर भारत अचूक आणि निर्णायक प्रहार करणार, असा इशारा मोदींनी पाकिस्तानला दिला आहे.