
Narendra Modi On GST : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (21 सप्टेंबर) जनतेला संबोधित केले. नवरात्री पर्वाच्या पूर्वसंध्येला मोदी यांनी यावेळी महत्त्वाच्या घोषणा केली. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला आहे. त्यांनी जीएसटीवर महत्त्वाची माहिती दिली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून जीएसटीचे नवे दर लागू होतील, अशी घोषणा यावेळी मोदी यांनी केली. तसेच हा नवा कर लागू झाल्यानंतर भारतीयांचा एका प्रकारे बचत उत्सव सुरू होईल, असेही यावेळी मोदी म्हणाले. तसेच या नव्या जीएसटी दरामुळे शेतकरी, महिला, युवक यांचा फायदा होईल, असेही भाष्य यावेळी मोदी यांनी जनेला संबोधित करताना केले.
आता नवरात्रीचे पर्व चालू होणार आहे. तुम्हा सर्वांनाच शुभेच्छा. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. 22 सप्टेंबरपासून सुर्योदयानंतर जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होणार आहेत. एका प्रकारे देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार आहे. या जीएसटी बचत उत्सवात तुमची बचत वाढणार आहे. तुम्ही तुमच्या पसंदीच्या वस्तूंना खरेदी करू शकाल.
यामुळे मध्यमवर्ग, युवक, शेतकरी, महिला, दुकानदार, नागरिक, उद्योजक अशा सर्वांनाच या बचत उत्सवाचा खूप फायदा होणार आहे. म्हणजेच सणांच्या या उत्सवात सर्वांचेच तोंड गोड होईल. देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे. मी देशातील कोट्यवधी कुटुंबांना जीएसटीच्या नव्या सुधारणांबद्दल शुभेच्छा देतो. या सुधारणा भारताच्या विकासाला गतिमान करतील. व्यवसायांना आणखी सोपे केले जाईल. या नव्या सुधारणांमुळे प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीने यायला मदत होईल. 2017 साली भारताने जीएसटीच्या सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकले होते. नवा इतिहास रचण्याची ही एक सुरुवात होती. अगोदर देशातील जनता वेगवेगळ्या करांमध्ये अडकलेली होती.
अगोदर एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पोहोचवायचा असेल तर कित्येक फॉर्म भरावे लागत होते. प्रत्येक ठिकाणी कराचे नवे नियम होते. त्यामुळे अनेक अडचणी यायच्या. आता मात्र वन नेशन नव टॅक्स या धोरणामुळे अडचणी कमी होतील.