20 वा रोजगार मेळावा: पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51 हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान केली. यासोबतच ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी नव्या नियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित केलं.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 20 व्या रोजगार मेळाव्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध सरकारी संस्थामध्ये नियुक्त झालेल्या 51 हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र वितरीत केली. केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून युवकांना भविष्यातील आव्हानांसाठी आवश्यक कौशल्ये आणि संधी उपलब्ध करून देण्यावर सातत्याने भर देत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. बदलत्या अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार देशातील युवकांचं शिक्षण आणि कौशल्यं अनुरूप असावीत, याची खात्री करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केलं.
खासगी क्षेत्रातील रोजागाराच्या संधी वेगाने वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे, असं मोदी म्हणाले. याच उद्देशाने सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या खर्चासह प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी युवक पहिल्यांदाच कार्यबलात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत पहिली नोकरी मिळवणाऱ्या युवकांना सरकारकडून 15 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जात आहे, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. तसेच अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहन दिलं जात आहे.
भारताने गेल्या काही वर्षांत सुमारे 40 देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत, त्यामुळे देशातील युवकांसाठी नव्या संधींचे दरवाजे खुले होत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. या करारांमुळे उद्योजकांसाठी नवी भागीदारी आणि बाजारपेठ यांचे मार्ग खुले झाले असून युवकांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील युवकांच्या प्रतिभा आणि कौशल्यावर संपूर्ण जगाचा विश्वास आहे. भारतातील नवोन्मेषक, उद्योजक आणि युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
45 ठिकाणी आयोजित रोजगार मेळावा
हा 20 वा रोजगार मेळावा देशभरातील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला. नवनियुक्त युवक भारत सरकारच्या वित्त, रेल्वे, गृह, आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच संरक्षण यांसह विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत. वृत्तांनुसार, ऑक्टोबर 2023 पासून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रोजगार मेळावा उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे 12 लाख नियुक्तीपत्रं वितरित करण्यात आली आहेत. यामध्ये अनेकदा एकाच वेळी हजारो नियुक्तीपत्रं प्रदान केली जातात.
