पंतप्रधान मोदींनी केली इंडियन स्पेस असोसिएशनची सुरुवात, अंतराळ विश्वात क्रांती करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल

| Updated on: Oct 11, 2021 | 12:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी इंडियन स्पेस असोसिएशनची सुरुवात केली. यावेळी अंतराळ उद्योगाच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींनी केली इंडियन स्पेस असोसिएशनची सुरुवात, अंतराळ विश्वात क्रांती करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल
Narendra Modi
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी इंडियन स्पेस असोसिएशनची सुरुवात केली. यावेळी अंतराळ उद्योगाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा आम्ही अंतराळ सुधारणांबद्दल बोलतो, तेव्हा आमचा दृष्टिकोन 4 खांबांवर आधारलेला असतो. पहिलं, खाजगी क्षेत्राला नवीन कल्पना करण्याचं स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. दुसरं म्हणजे, लोकांना सक्षम बनवणारी सरकारची भूमिका. तिसरं, युवकांना भविष्यासाठी तयार करणं आणि चौथं, अंतराळ क्षेत्राला सामान्य माणसाच्या प्रगतीचे साधन म्हणून पाहणं. ( PM Narendra Modi launched Indian Space Association today and interact with Space Industry representatives)

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज भारतात असं निर्णायक सरकार कधीच नव्हतं. अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञानासंदर्भात आज भारतात ज्या प्रमुख सुधारणा होत आहेत, हा त्याचा दुवा आहे. इंडियन स्पेस असोसिएशन म्हणजेच इस्पाच्या स्थापनेसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

‘सामान्य माणसासाठीही अंतराळ विश्व महत्त्वाचं’

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, 130 कोटी देशवासीयांच्या प्रगतीसाठी भारतीय अंतराळ क्षेत्र हे एक उत्तम माध्यम आहे. सामान्य माणसांसाठी अंतराळ क्षेत्रामध्ये उत्तम मॅपिंग, इमेजिंग आणि कनेक्टिव्हिटी सुविधा. आपल्यासाठी अंतराळ क्षेत्रात चांगल्या संधी आहेत, शिपमेंटपासून ते उद्योजकासाठी वितरणापर्यंतच्या सर्व गोष्टी यात आहेत.

‘भारत नव्या कल्पनांचं जागतिक केंद्र’

स्वावलंबी भारतावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘स्वावलंबी भारत मोहीम ही केवळ एक दृष्टी नाही तर एक विचारशील, सुनियोजित, एकात्मिक आर्थिक धोरण आहे. भारताचे उद्योजक, भारतातील तरुणांची कौशल्य क्षमता वाढवून भारताला जागतिक उत्पादन पॉवर हाऊस बनवेल अशा रणनीतीची गरज आहे. हेच धोरण जगाला भारताकडे आकर्षित करते, आणि त्यामुळेच भारत हा नवकल्पनांचे जागतिक केंद्र बनत आहे.

जय प्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांना श्रद्धांजली

या कार्यक्रमादरम्यान, पीएम मोदींनी जय प्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांचीही आठवण काढली. ते म्हणाले, ‘आज देशाचे दोन महान सुपुत्र भारतरत्न जय प्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांचीही जयंती आहे. या दोन्ही महान व्यक्तींनी स्वातंत्र्योत्तर भारताला दिशा देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन, प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे, राष्ट्रात किती मोठे बदल होतात हे दाखवून दिले. त्यांचे जीवनाचं तत्वज्ञान आजही आपल्याला प्रेरणा देतं. मी जय प्रकाश नारायण जी आणि नानाजी देशमुख जी यांना नमन करतो, त्यांना माझी श्रद्धांजली.

इंडियन स्पेस असोसिएशन म्हणजे काय?

ISPA ही अंतराळ आणि उपग्रह बनवणाऱ्या कंपन्यांची प्रमुख उद्योग संघटना आहे, जी भारतीय अंतराळ उद्योगाचं एकत्रित रुप म्हणता येईळ. ISPA अंतराळासंबंधित धोरणं आखेल, त्यांबाबत सल्ला देईल आणि ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ‘आत्मनिभर भारत’ अंतर्गत ISPA ही संस्था, अंतराळ विश्वात क्रांती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे, आणि भारतातच अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करुन, अंतराळात नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल.

या कंपन्यांचा ISPA मध्ये समावेश

ISPA च्या संस्थापक सदस्यांमध्ये लार्सन अँड टुब्रो, नेल्को (टाटा ग्रुप), वनवेब, भारती एअरटेल, मॅप मी इंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे. इतर प्रमुख सदस्यांमध्ये गोदरेज, ह्यूजेस इंडिया, अझिस्टा-बीएसटी एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, BEL, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, मॅक्सर इंडिया यांचा समावेश आहे.

हेही वाचा:

नरेंद्र मोदी हुकूशाहीवर विश्वास ठेवतात? शहांनी सांगितलं, का असे सवाल केले जातात?

केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यम यांचा राजीनामा