
TVK Vijay Rally Stampede : ‘तमिलगा वेत्री कळ्ळगम’ (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख आणि साऊथ सुपरस्टार विजय यांच्या तमिळनाडूतील करूर इथल्या सभेत गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला. यात आठ बालके आणि सोळा महिलांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. ‘तमिळनाडूतील करूर इथं घटलेली घटना अत्यंत दु:खद आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांना माझ्या संवेदना, जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.
सभेसाठी 30 हजार नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज असताना प्रत्यक्षात मात्र 60 हजारांवर नागरिक सभास्थळी उपस्थित होते. विजय हे लोकप्रिय अभिनेते असून त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. सभेच्या ठिकाणी विजय यांचं आगमन झाल्यानंतर भाषणाला सुरुवात होताच चेंगराचेंगरी झाली. यावेळी नागरिकांची पळापळ झाल्याने अनेकजण एकमेकांच्या अंगावर कोसळून बेशुद्ध पडले. जखमींना तत्काळ करूर सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी 36 जणांना मृत घोषित केलं. तर 50 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सचिवालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. ‘करूरमधील घटना चिंताजनक आहे. जखमींना सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणेला आदेश दिले आहेत,’ असं ते म्हणाले.
தமிழ்நாட்டின் கரூரில் ஓர் அரசியல் பேரணியின் போது நிகழ்ந்த துயரமான சம்பவம் மிகவும் வருத்தம் அளிக்கிறது. இந்த நிகழ்வில், தங்கள் அன்பிற்குரியவர்களை இழந்தவர்களின் குடும்பத்தினருக்கு எனது இரங்கல்களைத் தெரிவித்துக் கொள்கிறேன். இந்தக் கடினமான காலகட்டத்தில் அவர்கள் மன வலிமையைப் பெற…
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025
‘तमिळनाडूतील करूर इथल्या सभेत घडलेल्या दु:खद घटनेनं प्रचंड वेदना दिल्या आहेत. या असह्य दु:खाच्या क्षणी ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि तमिळनाडूच्या जनतेप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावेत आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो’, असं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
‘तमिळनाडूच्या करूर इथल्या रॅलीमध्ये घडलेल्या घटनेनं मला खूप दु:ख झालं आहे. निष्पापांनी जीव गमावणं खरोखरंच हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रती मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो’, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.