
वंदे मातरम् या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज लोकसभेमध्ये चर्चा होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या चर्चेला सुरुवात झालीय. “वंदे मातरम् या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत, ही गर्वाची बाब आहे. मी सर्वांचे आभार मानतो. या महत्वपूर्ण प्रसंगी सामूहिक चर्चेचा मार्ग निवडला. ज्या मंत्राने, जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाल ऊर्जा, प्रेरणा दिली, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला, त्या वंदे मातरम् च स्मरण करणं हे आपल्या सर्वांच सौभाग्य आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “वंदे मातरम् चा 150 वर्षांचा प्रवास अनेक टप्प्यांवरुन गेला आहे. वंदे मातरम् ला 50 वर्ष झाली, तेव्हा देश गुलामीमध्ये होता. ज्यावेळी वंदे मातरम् ला 100 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आणीबाणी लागलेली. वंदे मातरम् साठी अत्यंत उत्तम पर्व पाहिजे, तेव्हा संविधानाचा गळा घोटलेला” असं पीएम मोदी म्हणाले.
“ज्यावेळी वंदे मातरम् ला 100 वर्ष झाली, त्यावेळी देशभक्तीसाठी जगणारे-मरणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकलं होतं. ज्या वंदे मातरम् गीताने देशाच्या स्वातंत्र्याला ऊर्जा दिली. त्याला 100 वर्ष पूर्ण होताना आमच्या इतिहासाचा एक काळा कालखंड दुर्भाग्याने समोर येतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस झुकली
“काँग्रेसने मुस्लिम लीग समोर गुडघे टेकले. इतिहास याचा साक्षीदार आहे. काँग्रेसचे नेते आजही वंदे मातरम् वर वाद निर्माण करतात. मागच्या पिढीत वंदे मातरम् वर इतका अन्याय का झाला? वंदे मातरम् चा विश्वासघात झाला. वंदे मातरम् ला मुस्लिम लीगचा विरोध होता. तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस झुकली” असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
जिन्नाच्या विरोधानंतर नेहरुंना आपल्या खुर्चीला धोका वाटला
“देशावर जेव्हा संकट आलं तेव्हा वंदे मातरम् चा जयघोष झाला. वंदे मातरम् वर मुस्लिम लीगचं राजकारण अधिक तीव्र होत गेलं. वंदे मातरम् ला मुस्लिम लीगचा विरोधच होता. आपल्यावर वंदे मातरम् कर्ज आहे. जिन्नाने 1937 साली वंदे मातरम् ला विरोध केला. नेहरुंनी मुस्लिम लीगची निंदा केली नाही. जिन्नाच्या विरोधानंतर नेहरुंना आपल्या खुर्चीला धोका वाटला. जिन्नाच्या विरोधानंतर नेहरुंना भिती वाटली. वंदे मातरम् च्या काही शब्दांवर मुस्लिमांना आक्षेप होता. काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या दबावाखाली निर्णय घेतला” असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम् च्या चर्चे दरम्यान केले.