PM मोदींची आसाममधील चहाच्या मळ्याला भेट, महिलांसोबत चहाची पाने तोडत काढला सेल्फी
PM Modi in Assam : पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. आज त्यांनी एका चहाच्या मळ्याला भेट दिली आणि महिला कामगारांसोबत संवाद साधला

आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामला पोहोचले आहेत. आज प्रचारासाठी रवाना पंतप्रधानांनी दिवसाची सुरुवात एका चहाच्या बागेला भेट देऊन केली. या वेळी त्यांनी चहाच्या बागेत काम करणाऱ्या महिला कामगारांसोबत चहाची पाने तोडली, त्यांच्याशी संवाद साधला, सेल्फी काढला आणि आसामच्या चहाच्या जागतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर चहाच्या मळ्याला दिलेल्या भेटीचा अनुभव शेअर करताना चहाला आसामचा आत्मा असे म्हटले. राज्याच्या चहाने जगभरात एक वेगळी आणि खास ओळख निर्माण केली आहे. हा दौरा स्मरणीय अनुभव असल्याचे सांगत पंतप्रधानांनी कामगारांशी संवाद साधला. हे कामगार चहा उद्योगाचा कणा मानले जातात. पंतप्रधानांनी त्यांच्या योगदानाचे कौतुकही केले.
चहाच्या मळ्याशी जोडलेल्या कुटुंबांच्या प्रयत्नांचा अभिमान – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या प्रयत्नांचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांची मेहनत आणि समर्पणामुळे आसामचा गौरव वाढला आहे. या भेटीतील अनेक छायाचित्रे शेअर करत पंतप्रधानांनी लिहिले की, ‘चहाची पाने तोडल्यानंतर महिलांनी त्यांच्या संस्कृतीबद्दल सांगितले आणि मग आम्ही एकत्र सेल्फीही घेतल्या.”
Tea is the soul of Assam! The tea from here has made its way across the world.
This morning in Dibrugarh, I went to a tea garden and interacted with women working here. It was a very memorable experience. pic.twitter.com/2VZufAAZ0h
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चहा बागेतील कामगारांसोबतची ही संवाद साधण्याची घटना त्यांच्या चहाशी असलेल्या जुन्या वैयक्तिक नात्यालाही अधोरेखित करते. पंतप्रधान मोदी अनेकदा बोलताना म्हटले आहे की, संघर्षाच्या काळात त्यांनी गुजरातमधील एका रेल्वे स्थानकावर वडिलांसोबत चहा विकलेला आहे. या संघर्षातून पुढे जात ते देशाचे पंतप्रधान बनले. ही अनेकांसाठी एक प्रेरणादायी बाब आहे.
आसाम जगातील प्रमुख चहा उत्पादक राज्य
आसाम हे जगातील सर्वात मोठ्या चहा उत्पादक राज्यांपैकी एक आहे. भारताच्या चहा निर्यातीत आसामची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगात लाखो लोकांना रोजगार मिळतो. डिब्रूगढ, तिनसुकिया आणि जोरहाट या जिल्ह्यांतील चहा बागांमध्ये महिला कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी चहा बागेला भेट देणे आणि तेथील महिला कामगारांशी संवाद साधणे हे प्रतीकात्मक आणि रणनीतिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. या भेटीद्वारे आसामच्या सामाजिक-आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत चहा समुदायाचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच, चहा उद्योगाशी संबंधित लाखो मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो, त्यामुळे पंतप्रधानांची ही भेट खास मानली जात आहे.