तुरुंगात मोबाईल, फोनमध्ये पॉर्न! माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा; देशभरात खळबळ
बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवन्नाला तुरुंगात पॉर्न व्हिडिओ पाहताना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केल्यानंतर फॉरेन्सिक तपासणीत डझनभर पॉर्न व्हिडिओ आढळले. यामुळे तुरुंगातील व्हीआयपी सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याप्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

जनता दल (सेक्युलर) चा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र, खासदार राहिलेला आणि माजी पंतप्रधानांचा नातू असलेला रेवन्ना काही सुधारण्याचं लक्षण दिसत नाहीये. तो चक्क तुरुंगातच पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल आणि इतर डिव्हाइस जप्त केले आहेत. मोबाईलचा फॉरेन्सिक तपास केल्यानंतर रेवन्नाच्या फोनमध्ये डझनभर पॉर्न व्हिडिओ सापडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मागच्याच महिन्यात क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी तुरुंगात छापेमारी केली होती. त्यावेळी रेवन्ना तुरुंगात मोबाईलचा वापर करत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
प्रज्वल रेवन्ना हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे. बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर रेवन्नाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 11 ऑगस्ट रोजी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या तुरुंगात अचानक छापेमारी केली होती. त्यावेळी रेवन्ना मोबाईलचा वापर करत असल्याचं आढळून आलं होतं. रेवन्नाच्या कोठडीतून अधिकाऱ्यांनी हायसेक्युरिटी बॅरेकमधून एक चार्जर, एक पेन ड्राइव्ह आणि एक नोटबुक जप्त केले होते.
अधिकारी निलंबित, चौकशी सुरू
त्यानंतर जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि पेन ड्राईव्ह फॉरेन्सिक चौकशीसाठी पाठवण्यात आला. त्याचा रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टनुसार, फोनमध्ये डझनभर पॉर्न व्हिडीओ आणि पेन ड्राइव्हमध्ये वेब सीरीज आढळून आल्या आहेत. त्यामुळे रेवन्ना तुरुंगात पॉर्न व्हिडीओ पाहात असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच या निमित्ताने बंगळुरू तुरुंगात व्हिआयपी कैद्यांना मिळणाऱ्या खास सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, रेवन्नाच्या तुरुंगात मोबाईल आढळल्याने एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
फार्महाऊसवर बलात्कार
दरम्यान, रेवन्नावर गेल्या वर्षी एका 48 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आणि तिच्या लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. हासन जिल्ह्यातील होलेनरासीपुरामध्ये त्यांच्या फॉर्महाऊसवरील घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. या महिलेने तसा आरोप केला होता. रेवन्नाने 2021मध्ये आपल्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला होता. तसेच या महिलेवर बलात्कार करतानाचा त्याने व्हिडीओ तयार करून हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती.
