पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरबच्या दौऱ्यावर, प्रिन्स सलमानचे आमंत्रण, व्यापार, संरक्षणासह वक्फ कायद्यावर होणार चर्चा?
PM Modi on Saudi Arabia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 22 एप्रिल 2025 ला सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जेद्दाह इथं जाणार आहेत. या दौऱ्यात त्यांची सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 22 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जेद्दाह इथं जाणार आहेत. ते आज आणि उद्या सौदीत असतील. या दौऱ्यात त्यांची सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. हा दौरा भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील रणनीतिक भागीदारीला अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मोदी यांच्या तिसर्या कार्यकाळातील सौदी अरेबियाचा हा पहिला दौरा आहे.
भारत-सौदीत संबंध दृढ
भारत आणि सौदी अरब या दरम्यान गेल्या एका दशकात मजबूत झाले आहे. दोन्ही देशात व्यापार, ऊर्जा, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि नागरिकांमधील संबंध सदृढ झाले आहेत. 2023-24 मध्ये द्विपक्षीय व्यापार 43.3 अब्ज डॉलरपर्यंत पोहचले आहे. सौदी अरब हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तर भारत हा सौदी अरबचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी पार्टनर आहे.




दोन्ही देशांमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता:
संरक्षण सहकार्य : भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये सौदी सैन्याला भारतीय सैन्याकडून प्रशिक्षण देण्याचा समावेश आहे.
ऊर्जा आणि व्यापार : दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य आणि व्यापाराला चालना देण्यासाठी नवीन करार होण्याची शक्यता आहे. 2023-24 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 42.98 अब्ज डॉलर इतका होता. आयएमईसी (IMEC): भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (India-Middle East-Europe Economic Corridor) या प्रकल्पावरही चर्चा होण्याची शक्यता आहे
हज यात्रा : भारतीय हज यात्रेकरूंच्या संबंधित मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्दे : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध, या जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
करार आणि सामंजस्य करार : पहिल्या दिवशी (22 एप्रिल) भारत आणि सौदी अरेबिया किमान सहा सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, व्यापार, गुंतवणूक आणि रक्षा क्षेत्राशी संबंधित आणखी काही करारांना अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा सुरू आहे.
भारतीय प्रवासी समुदायाशी संवाद : सौदी अरेबियात 2.6 दशलक्ष भारतीय प्रवासी राहतात. या भारतीय प्रवाशांशी मोदी चर्चा करतील. पंतप्रधान मोदी जेद्दाह येथील एका कारखान्याला भेट देणार असून, तिथे कार्यरत भारतीय कामगारांशी संवाद साधणार आहेत.
ऐतिहासिक संदर्भ : हा पंतप्रधान मोदी यांचा सौदी अरेबियाचा तिसरा दौरा आहे. यापूर्वी ते 2016 आणि 2019 मध्ये सौदी अरेबियाला गेले होते. 2019 मध्ये भारत आणि सौदी अरेबियाने रणनीतिक भागीदारी परिषद (Strategic Partnership Council) स्थापन केली, ज्यामुळे द्विपक्षीय सहकार्याला संस्थात्मक स्वरूप मिळाले.क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2019 आणि 2023 मध्ये भारताला भेट दिली होती.
जेद्दाह भेटीचे महत्त्व : पंतप्रधान मोदींची जेद्दाह येथील ही भेट 40 वर्षांनंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची पहिली जेद्दाह भेट आहे. मोदी यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यापूर्वी होत आहे.
भारत-सौदी संबंधांचे महत्त्व : सौदी अरेबिया हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि भारताच्या कच्च्या तेलाच्या 17% गरजा पूर्ण करतो.. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील रक्षा, सायबर सुरक्षा, ड्रोन तंत्रज्ञान आणि संयुक्त सैन्य सराव यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढले आहे. सौदी अरेबियातील भारतीय प्रवासी समुदाय दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंधांचा महत्त्वाचा आधार आहे.
वक्फसंबंधी होणार चर्चा?
देशात वक्फ कायद्यावरून रणकंदन सुरू आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय पोहचला आहे. काही राज्यात या कायद्याला तीव्र विरोध होत आहे. त्यामागे बांगलादेशींचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 1995 मध्ये वक्फ कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. आता वक्फ मालमत्तांमध्ये केंद्र सरकारची भूमिका वाढली आहे. त्याच दरम्यान पंतप्रधान सौदीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर याविषयीशी संबंधीत चर्चा होईल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.