
बिहारमध्ये मतदानाच्या एकदिवस आधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन मोठा खुलासा केला. राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये मतचोरी पकडली. जेव्हा मी आकडे पाहिले तेव्हा माझा विश्वास बसला नाही. तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. मी माझ्या टीमला बोललो की, सर्व आकडे प्रत्येक सोर्सकडून डबल क्रॉस चेक करा” राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्सबद्दल सोशल मीडियावर हायड्रोजन बॉम्ब येतोय अशी पोस्ट सुद्धा केली. “हरियाणात पोस्टल मतदानात काँग्रेस पुढे होती. हरियाणात एक्झिट पोलमध्ये आमचा विजय दाखवला होता. हरियाणात काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये 1.18 लाख मतांचा फरक होता” असं राहुल गांधी म्हणाले.
“हरियाणाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा असं झालं की, पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांचा कल वेगवेगळा होता. यापूर्वी पोस्टल बॅलेट आणि वास्तविक मतं यांची दिशा एकसारखीच असायची. काँग्रेसचा 22,779 मतांनी पराभव झाला” असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये एका युवतीचा फोटो दाखवला. या फोटोसह वेगवेगळ्या नावाने 22 ठिकाणी मतदान केल्याचा आरोप केला. या युवतीने कुठे सीमा तर कुठे सरस्वती नावाने 22 वेळा मतदान केलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ब्राझीलची महिला हरियाणाच्या वोटर लिस्टमध्ये काय करत होती? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. हरियाणात पाच कॅटेगरीमध्ये 25 लाख मतांची चोरी झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दर आठ मतदारांमध्ये एक मतदार फेक
कॅटेगरी वाइज आकडे दाखवत 5 लाख 21 हजार डुप्लीकेट वोटर मिळाले. हरियाणामध्ये दोन कोटी मतदार आहेत. 25 लाख मतचोरीचा अर्थ होतो की, दर आठ मतदारांमध्ये एक मतदार फेक होता. म्हणूनच काँग्रेस हरली असा त्यांनी आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, “दालचंद यूपीमध्ये वोटर आहे. हरियाणामध्ये सुद्धा वोटर आहे. त्यांचा मुलगा हरियाणामध्ये सुद्धा वोटर आहे. यूपीमध्ये सुद्धा मतदान करतो. असे हजारोंच्या संख्येने लोक आहेत. ते भाजपशी संबंधित आहेत” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.