अनंत अंबानीच्या लग्नाच्या खर्चावर राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न, म्हणाले हा कोणाचा पैसा?
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अंबानींवर टीका केली आहे. अनंत अंबानींच्या लग्नात इतका पैसा खर्च झाला तो पैसा कोणाचा होता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, सर्व सामान्य लोकांना कर्ज काढून मुलांचे लग्न करावे लागते.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा या वर्षी विवाह झाला. या विवाह सोहळ्याची केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात चर्चा होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नावर तब्बल 5 हजार कोटी रुपये खर्च केलेत. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभेच्या निवडणूक प्रचारसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी बहादूरगडच्या रॅलीत म्हटले की, अंबानींनी त्यांच्या मुलाच्या लग्नावर हजारो कोटी रुपये खर्च केले. शेवटी हा पैसा कोणाचा होता?
हा कोणाचा पैसा?
बहादूरगडच्या रॅलीत राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही अंबानींच्या मुलाचे लग्न पाहिले आहे का? अंबानींनी या लग्नावर करोडो रुपये खर्च केलेत. हा पैसा कोणाचा आहे? हा तुमचा पैसा आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नासाठी बँकेकडून कर्ज घेता, पण सरकारने अशी रचना तयार केली आहे की, ज्याच्या अंतर्गत फक्त 25 लोकांच्या लग्नावर करोडो रुपये खर्च करता येतात, पण शेतकरी कर्जात बुडूनच आपल्या मुलांचे लग्न करू शकतो. हा संविधानावर हल्ला नाही तर काय आहे? त्यामुळे राहुल गांधी यांनी अंबानींच्या लग्नावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारला टार्गेट केले आहे.
लग्नाला दिग्गांची हजेरी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नावर 5,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न ठरले. 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता. जगातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नाला हजेरी लावली होती. ज्यामध्ये सेलिब्रिटी, राजकारणी आणि उद्योगपती यांचा समावेश होता. एनसी फायनान्शियल ॲडव्हायझरी सर्व्हिसेसचे संस्थापक नितीन चौधरी यांच्या अहवालानुसार अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचे एकूण बजेट मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीच्या ०.५ टक्के इतके होते.
#WATCH | Speaking at a public rally in Haryana’s Bahadurgarh, Congress MP & LoP Rahul Gandhi says,”…Have you seen Ambani wedding? Ambani spent crores on the wedding. Whose money is this? It is your money. …You take bank loans to marry your children but Narendra Modi ji has… pic.twitter.com/Cqe8KNZPwY
— ANI (@ANI) October 1, 2024
भारतीय लग्नासाठी किती करतात खर्च
अहवालानुसार, ज्या भारतीयांची एकूण संपत्ती 50 लाख ते 1 कोटी रुपये आहे, तो लग्नासाठी 10 ते 15 लाख रुपये सहज खर्च करू शकतो. ज्या व्यक्तीची एकूण संपत्ती 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तो लग्नासाठी 1.5 कोटी रुपये सहज खर्च करू शकतो. याचा अर्थ एक भारतीय त्याच्या एकूण संपत्तीपैकी 5 ते 15 टक्के रक्कम लग्नासाठी खर्च करतो. त्या तुलनेत अनंत अंबानींच्या लग्नाच्या खर्चावर नजर टाकली तर मुकेश अंबानी यांची त्यावेळची एकूण संपत्ती 123 अब्ज डॉलर होती. लग्नासाठी 5000 कोटी रुपये खर्च केले तरी ते एकूण संपत्तीच्या 0.5 टक्के इतके आहे.