रेल्वेचे तिकीट तपासणीस शोधणार प्रवाशांचे बनावट आधार कार्ड, रेल्वे मंत्रालयाकडून हे तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देश
रेल्वेतील टीटीई आता बनावट आधार कार्ड शोधणार आहे. त्यासाठी ‘एम-आधार एप्लिकेशन’चा वापर करणार आहे. ऑफलाइन मोडमध्येही हे कार्यरत असते. त्यामुळे बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी ते फायदेशीर आहे.

देशातील प्रत्येक नागरिकांना आधार कार्ड देण्यात आले आहे. आधार कार्ड सर्वात महत्वाचे सरकारी ओळखपत्र बनले आहे. या माध्यमातून अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळतो. परंतु अनेक बनावट आधार कार्डसुद्धा तयार झाले आहेत. आता हे बनावट आधार कार्ड शोधण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहे. तिकीट तपासणीस ‘एम-आधार एप्लिकेशन’च्या माध्यामातून बनावट आधार कार्ड शोधणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व रेल्वे विभागाला आदेश दिले आहे. त्यानुसार, तिकीट तपासणीसाने प्रवाशांची ओळख आधार ओळखीसाठी असलेल्या ‘एम-आधार एप्लिकेशन’च्या माध्यमातून करावी. त्यावेळी कोणाकडे बनावट आधार कार्ड मिळाले तर त्याची माहिती त्वरित रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस किंवा राज्य रेल्वे पोलिसांना द्यावी. काही व्यक्ती बनावट आधार कार्ड बनवून देशात राहत आहेत. त्या बनावट आधारचा वापर विविध ठिकाणी करत आहे.
रेल मंत्रालयाने प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधकांना पत्र लिहिले आहे. त्यात आधार कार्डचा दुरुपयोग आणि बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहे. टीटीईने प्रवाशांचा आधार ‘एम-आधार एप्लिकेशन’च्या माध्यमातून तपासले पाहिजे. या अँपमध्ये क्यूआर कोड आधारित सत्यापनाची सुविधा आहे. आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करताच त्या व्यक्तीची सर्व माहिती समोर येणार आहे. त्यात त्या व्यक्तीचे नाव, लिंग, जन्म तारीख, पत्ता आणि आधार क्रमांकाचा समावेश असणार आहे.
‘एम-आधार एप्लिकेशन’ ऑफलाइन मोडमध्येही कार्यरत असते. त्यामुळे बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी ते फायदेशीर आहे. टीटीईने ‘एम-आधार एप्लिकेशन’ डाऊनलोड करुन त्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी करावी. जर कोणत्याही प्रवाशाचे आधार कार्ड संशयास्पद किंवा बनावट आढळले तर त्याची माहिती ताबडतोब रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, राज्य रेल्वे पोलिसांना द्यावी. यामुळे आवश्यक कायदेशीर कारवाई करता येईल. मंत्रालयाने म्हटले की, आधार कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने बनावट ओळखपत्र स्वीकारले किंवा बनावट पद्धतीने आधार मिळवला तर त्याला तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
