अंडा पावची गाडी चालवायचे, पण घरात सापडलं मोठं घबाड! लाखोंची रक्कम, सोनं-चांदी अन् बरंच काही
अंडा पावची गाडी चालवणाऱ्या तोमर बंधूच्या घरात कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. अंडा पावची गाडी चालवणारे दोघे भाऊ आज कोट्यवधींचे मालक कसे बनले ते जाणून घेऊयात.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंडा पावची गाडी चालवणाऱ्या तोमर बंधूच्या घरात कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. एका प्रकरणाचा तपास करत असताना पोलीसांनी तोमर बंधूंच्या घरावर छापा टाकला, त्यावेळी त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. अंडा पावची गाडी चालवणारे दोघे भाऊ आज कोट्यवधींचे मालक कसे बनले ते जाणून घेऊयात.
१४ तासांची शोधमोहीम
मिळालेल्या माहितीनुसार,रायपूरच्या जोरा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये प्रॉपर्टी डीलरवर हल्ला झाला होता, या प्रकरणाचा तपास करताना पोलीसांनी रोहित सिंग तोमरच्या घरी धाड टाकली, यावेळी केलेल्या १४ तासांच्या तपासात पोलीसांना कोट्यावधींची मालमत्ता सापडली आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता पोलीस तोमर बंधूंच्या घरी पोहोचले होते,त्यावेळी सुरु झालेली शोधमोहीम दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती.
महत्वाच्या वस्तू जप्त
तोमर बंधूंच्या घरातून पोलीसांना एक पिस्तूल व एक रिव्हॉल्व्हर सापडला. तसेच घरातून जंगम आणि स्थावर मालमत्ताही सापडली. यात ३५ लाख रुपयांची रोकड, नोटा मोजण्याची मशीन, ६६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने, १२५ ग्रॅम चांदी, ब्रेझा कार, थार आणि बीएमडब्ल्यू कार सापडली आहे. तसेच मालमत्तेच्या कागदपत्रांनी भरलेल्या दोन बॅगाही पोलिसांना सापडल्या आहेत. या सर्व वस्तू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
अंडापाव विकणारे बनले करोडपती
पोलीसांनी तोमर बंधूंना रोख रक्कम, सोने आणि इतर वस्तूंचा हिशोब आणि बिल मागितले आहे. हे दोघे भाऊ काही वर्षांपूर्वीपर्यंत छोटी गाडी लावून अंडा पाव विकत असत. मात्र आज दोन्ही भाऊ करोडोंचे मालक बनले आहेत. त्यांच्याकडे ५ हजार चौरस फूट जागेत बांधलेला एक आलिशान बंगला आहे. तेच बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर आणि थार सारख्या अनेक गाड्या असल्याचे समोर आले आहे.
व्याजाच्या पैशातून बनले श्रीमंत
मिळालेल्या माहितीनुसार तोमर बंधू लहान व्यावसायिकांना १० टक्के व्याजदराने पैसे देत असत. मात्र नंतर त्यांच्याकडून १० पट जास्त रक्कम वसूल करत असत. तसेच जर एखादा व्यक्ती पैसे देण्यास असमर्थ असेल तर ते जबरदस्तीने त्याची मालमत्ता बळकावत असत. त्यांनी आतापर्यंत अशा अनेक लोकांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. यामुळेच ते श्रीमंत बनत गेले व कोट्यावधींचे मालक बनले. आता ते प्रॉपर्टी डीलरवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. आगामी काळात तोमर बंधू मालमत्तेची कागदपत्रे सादर करण्यास अपयशी ठरल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
