
PM Narendra Modi on Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कार स्फोटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यापूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्यातील गुन्हेगारांना अद्दल घडवणार असल्याचे वक्तव्य केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कटातील कुणालाही सोडणार नसल्याचे म्हटले आहे. या सर्वांना लवकरात लवकर न्यायापालिकेच्या कक्षेत आणणार असल्याचे ते म्हणाले. सोमवारी 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. त्यात आतापर्यंत
12 लोकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले.
पंतप्रधानांचा दहशतवादी शक्तींना इशारा
भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटावर प्रतिक्रिया दिली. या षडयंत्रामागील, कटामागील कुणालाही सोडणार नाही. सर्व जबाबदार लोकांना न्यायाच्या कक्षेत आणणार असे ते म्हणाले. आज माझ्या मनाला वेदना झाल्या. काल संध्याकाळी दिल्लीत जी भयावह घटना घडली त्याने सर्वांनाच धक्का बसला. मी या घटनेतील लोकांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. आज संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी काल रात्रीपासून या संदर्भात तपास करणाऱ्या यंत्रणांच्या संपर्कात आहे. आमच्या तपास यंत्रणआ या हल्ल्याच्या मुळाशी जातील. यामागील कुणाचाही हात असला तरी त्याला सोडणार नाही. सर्व संबंधितांना न्यायाच्या कक्षेत आणण्यात येईल.
दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला स्फोटाप्रकरणी बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हा दहशतवादी हल्ला असल्याचे समजून तपास करत आहेत. सुरुवातीच्या फॉरेन्सिक अहवाल, गुप्तवार्तानुसार हा दहशतवादी हल्ला असू शकतो. हरियाणात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद येथे 2,900 किलो स्फोटक जप्त केल्याच्या काही तासानंतर हा स्फोट झाला आहे. त्यामुळे यामागील फरीदाबाद मॉड्युल उघड झाले आहे. कुणीही अफवा अथवा खोटी छायाचित्रांचा प्रसार करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेने दिल्लीत भीतीचे वातावरण होते. तर पीडित कुटुंबांना लवकर न्याय मिळावा आणि सुरक्षा उपाय करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
#WATCH | Thimphu, Bhutan: On Delhi car blast, PM Narendra Modi says, “…The conspirators behind this will not be spared. All those responsible will be brought to justice.”
“Today, I come here with a very heavy heart. The horrific incident that took place in Delhi yesterday… pic.twitter.com/64aved9Ke1
— ANI (@ANI) November 11, 2025
जैश-ए-मोहम्मदकडे इशारा
या घटनेतील सर्व तार आणि घटनाक्रम हा पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडे इशारा करत आहे. भारताने मे महिन्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवला होता. ही सर्व ठिकाणं जैशची होती. या संघटनेचा म्होरक्या आणि दहशतवादी मौलाना मसूद अझहर याने नुकताच भारताला धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. भारताच्या स्ट्राईकमध्ये त्याचा जावाई आणि इतर नातेवाईक मारल्या गेले होते. तर त्याने नुकतीच जैशची महिला ब्रिगेडही स्थापन केली आहे. त्यातंर्गत पाकिस्तानमधील महिलांना जिहादसाठी तयार करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर जैशची महिला ब्रिगेड भारत आणि बांगलादेशमध्ये पण गुप्तरित्या सुरू करण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असल्याचे समोर येत आहे. दिल्ली स्फोटातील अनेक घाडमोडी या जैशशी संबंधित असल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता पाकिस्तान आणि भारतात पुन्हा संघर्ष होण्याची चर्चा होत आहे.