
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांनी गुरुवारी काँग्रेसवर निशाणा साधला. 50 वर्षांपूर्वी देशात आणीबाणी लागू करण्यात आली, त्याविषयी माफी मागण्याची मागणी त्यांनी केली. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. संविधानाच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द हटवण्याची वकील त्यांनी केली. आणीबाणीच्या काळात हे दोन शब्द काँग्रेसने त्यावेळी घटनेत जोडले होते.
वर्ष 1975 मध्ये आणीबाणीच्या आठवणींना उजळा देत होसबाळे यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. या काळात लोकांना जबरदस्ती तुरुंगात डांबले. त्यांना अनंत यातना देण्यात आल्याचे ते म्हणाले. न्यायपालिका आणि माध्यमांचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्यात आले. आणीबाणीच्या काळात जबरदस्तीने लोकांची नसबंदी करण्यात आली. त्यावेळी जे लोक हे करत होते. जो पक्ष हे करत होता. तो आज संविधानाची प्रत हाती घेऊन फिरत असल्याचा निशाणा त्यांनी साधला. त्यांनी आतापर्यंत माफी मागितली नाही. आता त्यांनी माफी मागावी. तुमच्या पूर्वजांनी आणीबाणी लादली, तुम्ही आता माफी मागितली पाहिजे.
केव्हा आणि का लागू करण्यात आली आणीबाणी?
25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. अलहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधानांची खासदारकीच रद्द करण्याबाबतच निकाल दिला होता.अंतर्गत अशातंता असल्याचा दाखल देत सरकारने नंतर देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी आरएसएस, जनसंघ आणि विरोधी पक्षातील नेत्यांसह देशातील अनेक लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. जेपी आंदोलनाचे नेते जयप्रकाश नारायण यांच्यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत अनेक जण त्यावेळी तुरूंगात होते.
आणीबाणीत संजय गांधी यांच्या नेतृत्वात अनेक पुरुषांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गावा गावात, शहरात त्यासाठी नसबंदीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात गरीब आणि हातावरचे पोट असणार्या पुरुषांना शारीरिक आणि मानसिक धक्का बसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. आणीबाणीत माध्यमांवर अघोषित बंदी लादण्यात आली होती. आणीबाणीविरोधात विरोधकांनी उग्र आंदोलन केले होते. त्यावेळी घटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द दुरुस्तीनंतर जोडण्यात आले होते.