आणीबाणीच्या काळात RSS च्या हजारो कार्यकर्त्यांना अटक; तुरुंगात छळ, अनेकांचा मृत्यू – सुनील आंबेकर
आजच्या दिवशी 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. या आणीबाणीत आरएसएसच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आली होती.

आजच्या दिवशी 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. या आणीबाणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आली होती, तसेच अनेकांचा मृत्यू झाला होता अशी माहिती आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
सुनील आंबेकर यांनी सांगितले की, ’25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती, त्यावेळी संघाच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते. तसेच त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्यात आला होता. या आणीबाणीच्या काळात किमान 100 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, त्यापैकी काही जण तुरुंगात तर काही तुरुंगातून बाहेर आल्यावर मरण पावले होते. यात तत्कालीन अखिल भारतीय प्रणाली समितीचे प्रमुख पांडुरंग क्षीरसागर यांचाही समावेश होता.’
आणीबाणी लोकशाहीवरील कलंक
सुनील आंबेकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘आणीबाणी ही भारताच्या लोकशाहीवरील काळा डाग आहे. देशातील ही 21 महिन्यांची हुकूमशाही कधीही विसरता न येणारी आहे. त्याचबरोबर सरकार आणि आणीबाणीला पाठिंबा देण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांचा छळ करण्यात आला, त्यांना थर्ड डिग्री देखील देण्यात आली.’
स्वयंसेवकांना अटक
आंबेकर पुढे बोलताना म्हणाले की, 1975 साली संघाचे सुमारे 1300 प्रचारक होते. त्यातील 189 प्रचारकांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी संघाच्या देशभरात 50 हजार शाखा होत्या, या शाखांच्या माध्यमातून देशभरात लोकशाही वाचवा चळवळ सुरु केली होती.
संघाच्या चळवळीत 80 हजार ते 1 लाख लोकांचा सहभाग
आंबेकर यांनी म्हटले की, ‘संघाच्या चळवळीत 80 हजार ते एक लाख लोकांनी भाग घेतला होता, यामुळे आणीबाणी संपली आणि पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या.आणीबाणीतील पीडित लोकांच्या आठवणीसाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.’
