एलआयसीचे 50 हजार कोटी बुडाले, संजय राऊत यांनी दिलं नेहरु, मनमोहन सिंग यांचं उदाहरण; भाजपला दाखवला आरसा

राष्ट्रहिताचा प्रश्न येतो. तेव्हा कोणी कुणाचा मित्र नसतो. अशावेळी कोण कुणाचा मित्र आहे हे पाहात आहात. अशावेळी पंतप्रधानांनी तोंड उघडायला पाहिजे. या देशाच्या पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं.

एलआयसीचे 50 हजार कोटी बुडाले, संजय राऊत यांनी दिलं नेहरु, मनमोहन सिंग यांचं उदाहरण; भाजपला दाखवला आरसा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 06, 2023 | 10:26 AM

नवी दिल्ली: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कारभारावर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप सरकारवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नेहरुंचा काळ असेल किंवा इंदिरा गांधींचा. किंवा मनमोहन सिंगाचा काळ असेल. या 67 वर्षात एलआयसीचं एक रुपयाचंही नुकसान झालं नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात एलआयसीचे 50 हजार कोटींचे नुकसान झालं आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते मीडियाशी संवाद साधला.

अदानी विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहे. एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन होत आहे. एलआयसीचं 50 हजार कोटीचं नुकसान झालं आहे. जिंदगी के पहले भी, जिंदगी के बाद भी एवढा एलआयसीवर विश्वास होता. गेल्या 67 वर्षात एलआयसीचं एक रुपयाचंही नुकसान झालं नव्हतं, असं संजय राऊत म्हणाले.

हा निर्लज्जपणा

हा नेहरुंचा काळ असेल. इंदिरा गांधींचा काळ असेल, लालबहादूर शास्त्री, व्हिपी सिंग, नरसिंह राव, मनमोहन सिंगांचा काळ असेल या 67 वर्षाच्या काळात एलआयसीचं एक रुपयांचंही नुकसान झालं नाही. ते आता गेल्या 7 वर्षात 50 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हा जनतेचा पैसा आहे. तो डुबलाय. तरीही सरकार म्हणतेय ऑल इज वेल. काही घडलं नाही. हा निर्लज्जपणा आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

आंदोलन करणार

मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये थोड्यावेळात आम्ही जमणार आहोत. अदानी प्रकरणावरून कोणती भूमिका घ्यायची हे ठरवणार आहोत. आम्ही संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहोत. अमृतकाळाताली हा महाघोटाळा आला आहे.

त्यावर आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कोणती भूमिका घ्यावी त्यावर निर्णय घेऊ. विरोधक जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तेव्हा कोणी कुणाचा मित्र नसतो

अदानी हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचेही मित्र आहेत, असं विचारलं असता, राष्ट्रहिताचा प्रश्न येतो. तेव्हा कोणी कुणाचा मित्र नसतो. अशावेळी कोण कुणाचा मित्र आहे हे पाहात आहात. अशावेळी पंतप्रधानांनी तोंड उघडायला पाहिजे. या देशाच्या पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं. तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करताय? असा सवाल राऊत यांनी केला.

आप क्यों चूप हो

या प्रकरणावर देशाच्या पंतप्रधानांनी, तपास यंत्रणांनी बोलायला हवं. त्यांच्याकडून अपेक्षा करा. विरोधी पक्ष म्हणून जी ताकद आहे. ती आम्ही लावत आहोत. पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. या संदर्भात कारवाई करायला तयार नाहीत. आप क्यों चूप हो, हा प्रश्न जनतेने पंतप्रधानांना विचारला पाहिजे. आप मन की बात क्यों नही बोलते, असं विचारायला हवं, असंही ते म्हणाले.