
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला होता. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक पावले उचलली. त्यावेळी पाकिस्तानी सेलिब्रिटीजचे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक करण्यात आले होते. त्यातील काही पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी २ जुलै रोजी उठवण्यात आली होती. पण एका दिवसानंतर या अकाउंट्सवर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानी सेलिब्रिटी माहिरा खान, मावरा होकेन, यमना जैदी, हानिया आमिर आणि फवाद खान यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २ जुलै रोजी सबा कमर, मावरा होकेन, शाहिद आफ्रिदी, अहद रझा मीर यासारख्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात दिसत होते. तसेच हम टीव्ही, एआरवाय डिजिटल आणि हर पल जिओ सारख्या पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलचा एक्सेस दिसत होता. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. परंतु आता गुरुवारी सकाळपासून या सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात पुन्हा दिसत नाही.
पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवल्यानंतर टीकाही सुरु झाली होती. माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल म्हणाले होते की, बंदी उठवण्यामागील तर्क स्पष्ट नाही. जर ऑपरेशन सिंदूर ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असती तर ही बंदी सुरूच ठेवायला हवी होती. दोन्ही राष्ट्रातील संबंध पुन्हा मैत्रीपूर्ण झाले आहे का?
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली. पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम हल्ल्यानंतर त्यांचे कलाकार आणि चॅनेल भारतात दिसणे हे देशाच्या शहीदांचा अपमान आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. तसेच पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रिटीजचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन केले. पाकिस्तानमधील १६ यूट्यूब चॅनलही बंद केले. त्यात डॉन न्यूज, समा टीवी, एआरबाय न्यूज आणि जियो न्यूजचा समावेश आहे. या चॅनलकडून भारतविरोधातील कंटेट दिला जात होता.