2,50,000 मतदार गेले कुठे? माझ्या मतदारसंघापासून चौकशी सुरू करा; सुप्रिया सुळे यांचं खुलं आव्हान
दिल्लीत आज संसदेवर मार्च काढण्यात येणार आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमचे सर्व खासदार मोर्चात येतील. काही खासदार दुष्काळात अडकले आहेत. महाराष्ट् सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, पण शेतकऱ्यांना अद्याप मदत दिली जात नाही. आम्ही दुष्काळाविरोधात लढत आहोत. महागाई वाढत आहे. लोकांनी जगायचं कसं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी व्होट चोरी झाली आहे, यावर मी ठाम आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या, मग व्होट चोरी कशी झाली? असं सत्ताधारी मला विचारतात. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, या व्होट चोरीची माझ्या मतदारसंघापासून चौकशी सुरू करा. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील एकट्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 2,50,000 लाख मतदार गायब झाले आहेत. हे मतदार गेले कुठे? या समोर, चर्चा करा, मी चर्चेला तयार आहे, असं खुलं आव्हानच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
बारामती लोकसभेपासून चौकशी सुरू करा. मी निवडून आले म्हणून माझ्या मतदारसंघातून चौकशी करू नये असं नाही. चौकशीसाठी माझी तयारी आहे. व्होटर लिस्ट द्या. नावं कुठली गेली? कुठे गेली सांगा? राज्यात सहा विधानसभेमागे एक लोकसभा मतदारसंघ आहे. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला विधानसभा आहे. खडकवासलात मी मायनस आहे. हवं तर मी जिथे प्लस आणि मायनस आहे, ते दोन्ही मतदारसंघ चौकशीसाठी घ्या. बारामती लोकसभा मतदारसंघात 7 लाख मतदार कमी झाले. त्यातील अडीच लाख मतदार एकट्या खडकवासल्यात कमी झाले. विधानसभेला अडीच लाख लोकांनी मतदान केलं. लोकसभेला या विधानसभेत 5 लाख मतदार होते. त्यात विधानसभेत 50 हजाराची वाढ झाली. विधानसभेनंतर हा मतदारसंघ अडीच लाखांनी परत कमी झाला. मग हे अडीच ते तीन लाख मतदार कोण असू शकतात? दुबार असू शकतात? एखाद्याने घर बदललं असू शकतं? माहिती द्या. अडीच लाख मतदार कसे कमी झाले? 50 हजार अधिकचे मतदार कसे वाढले? म्हणजे 3 लाख मतदार माझ्या लोकसभा मतदारसंघातून कमी झाले, असं गणितच सुप्रिया सुळे यांनी मांडलं.
सत्ताधारी चर्चेला का तयार नाही?
केवळ राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. तर यंत्रणेत बदल आणला पाहिजे. सशक्त लोकशाहीत चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो. आम्ही चर्चेला तयार आहोत. समोरचे कुठे तयार आहेत? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. बेरोजगारी वाढली हे देशाचा डेटा सांगतो, महागाई वाढली हे देशाचा डेटा सांगतोय. व्होट चोरी झालीय हा डेटा सांगतोय, तुम्ही दुष्काळ रोजच दाखवत आहात. एवढी आव्हाने असताना सत्ताधारी त्यावर काही करताना दिसत नाहीत. सत्ताधारी चर्चेला का तयार नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
नैतिक जबाबदारी घ्यावी की नाही?
दिल्लीत काल सीजेपीच्या आंदोलनावेळी पोलीस कसे संभ्रमात होते, याची धक्कादायक माहितीच त्यांनी दिली. काल पत्रकारांनाही अटक करण्यात आली. तीन पत्रकारांना अटक झाली. त्यांनी मीडियाचे कार्ड दाखवले तरी त्यांना अटक केली. नंतर फोनाफोनी झाल्यावर त्यांना सोडलं. जंतरमंतरवर एक 14 वर्षाचा मुलगा एकटाच चालला होता. त्याला पोलिसांनी जायला मज्जाव केला. त्यावेळी त्याने तुम्हाला कलम 144 माहीत आहे का? असा सवाल पोलिसांना केला. मी एकटा चाललोय. मला कोणी थांबवू शकत नाही, असं तो मुलगा म्हणाला. कायद्यानुसार तुम्ही मला अटकाव करू शकत नाही, असं तो पोलिसांना सांगत होता. पण पोलिसांना त्या कलमाचा अर्थच माहीत नव्हता. तुम्ही एकट्या मुलाला का अटक करत आहात? दिल्ली पोलिसांच्या मनात काय आहे कळत नाही, असा सवाल त्यांनी केला.
देश आणीबाणीच्या दिशेने चालला का हे दिसत आहे. सरकारची नैतिकता संपली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. तरीही तुमच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यावेळी नैतिक जबाबदारी घ्यावी की नाही? सत्ताधाऱ्यांची नैतिकता संपलीय का अशी वेळ आली आहे. सरकार दरबारी न्याय मागत आहोत. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. राष्ट्रपतींना न्याय मागितला. पण मिळाला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
