
Swami Avimukteshwaranand Chaturangini Sena: स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे त्यांच्या स्पष्ट बोलण्याने हिंदुत्ववाद्यांच्या अजेंड्यावर आले आहेत. त्यांच्या काही वक्तव्यांवर उजव्या गटाने मोठा आक्षेप घेतला आहे. भाजपच्या काही संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रोश केला. तर उत्तर प्रदेश सरकारविरोधात त्यांचे तीव्र मतभेद समोर आले. त्यांच्यावर लैंगिक छळापासून ते इतर गुन्हे दाखल करण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. ते राहुल गांधी आणि काँग्रेसचे शंकराचार्य असल्याचा दावा उजव्या गटाने केला. आता शंकराचार्यांनी 2.18 लाखांचे सैन्य स्थापन्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली आहे. श्रीविद्यामठ, केदारघाट येथे त्यांनी चतुरंगिणी सैन्य स्थापन्याची घोषणा केली.
केवळ धर्मग्रंथावर चर्चा करणे पुरेसं नाही
सध्या हिंदूसाठी संक्रमणाचा काळ आहे. या काळात गौ-माता, हुशार ब्राह्मण, सनातन धर्माची प्रतीकं, कमकुवत सनातनी यांच्यावर अत्याचार वाढला आहे. तेव्हा केवळ धर्मग्रंथांवर चर्चा करणे आता पुरेसं नाही असा इशाराच शंकराचार्यांनी दिला. ‘गवां दुःखमपाकर्तुं शस्त्रं जग्राह भार्गवः’ या परशूरामाच्या संकल्पाचा आठव स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना झाला. त्यांनी चतुरंगिणी सैन्य स्थापन्याची घोषणा केली. अर्थात त्यावरून आता वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
क्षमा आणि संरक्षणाची शपथ
स्वामी अविमक्तेश्वरानंद यांच्या मते ही ‘चतुरंगिणी’ प्रत्येक सनातनी हिंदूचे संरक्षण करेल. हिंदू समाजातील भितीचे वातावरण दूर करणे, नष्ट करणे हे महत्त्वाचे कार्य है सैनिक करतील. त्यामुळे कोणताही सनातनी हिंदू सत्य बोलेल. तो त्याचा पक्ष मांडू शकेल. जेव्हा हिंदू समाजाला त्यांच्या मागे एक सुसंघटित आणि सशस्त्र दल असल्याचा विश्वास असेल, तेव्हा हा समाज धर्ममार्गावर न डगमगता चालेल असा विश्वास शंकराचार्यांनी व्यक्त केला.
अशी असेल लष्कराची रचना
प्राचीन भारतीय युद्धशास्त्राआधारे है सैन्य असेल. यामध्ये नऊ स्तराची पदरचना असेल. लष्करी रचनेनुसार पट्टिपाल, सेनामुखपती, गुलमपती, गणपाल, वाहिनीपती, पुतनापती, चामुपती, अनिकिनीपती आणि महासेनापती अशी पदरचना असेल. या प्रत्येक पदाची जबाबदारी आणि कर्तव्यांची अंमलबजावणी त्यांनाी करावी लागेल. सैन्यात एक लष्करप्रमुख, त्याच्या हाताखाली तीन सर्वोच्च प्रमुख, संयुक्त सर्वोच्च प्रमुख असतील. या सैन्यात पुरूष, महिला आणि तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी असतील. ते सामाजिक आणि धार्मिक संतुलन ठेवतील.
या प्रत्येक अधिकाऱ्याची स्वतःची विशिष्ट लष्करी कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या असतील. संघटनेच्या सर्वोच्च स्तरावर सर्वोच्च प्रमुख असतील, ज्यांच्या अधिपत्याखाली तीन सर्वोच्च प्रमुख, संयुक्त सर्वोच्च प्रमुख आणि संयुक्त सर्वोच्च प्रमुख (पुरुष, महिला आणि तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी) सामाजिक आणि धार्मिक संतुलन राखतील.
या लष्कारवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार प्रमुख अंग असतील. त्याचे चार प्रमुख असतील. हे प्रमुख लष्कराचे मनुष्यबळ, भौतिक सामर्थ्य, आर्थिक रसद आणि मनुष्यबळाला नियंत्रित करतील. प्रत्येक प्रमुखाच्या अंतर्गत जवळपास पाच खास विभाग असतील. असे एकूण 20 विभाग असतील. या लष्कराला मल्लविद्या, लाठी, कुऱ्हाड, परशू, खडग आणि इतर शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.