धावत्या ट्रेनमध्ये 3 किलो सोन्याची जबरी चोरी, काहीच क्ल्यू नाही, अचानक एक वस्तू मिळाली अन्… काय घडलं नेमकं?

तामिळनाडूमध्ये धावत्या ट्रेनमधून 3 किलो सोन्याची चोरी झाली. पोलीस हैराण झाले असताना, मात्र फेकलेल्या बॅगेतील एका वस्तूमुळे चोराचा छडा लागला. एका चुकीमुळे 17 वर्षांपासून गुन्हेगारीपासून दूर राहिलेला चोर पुन्हा पकडला गेला.

धावत्या ट्रेनमध्ये 3 किलो सोन्याची जबरी चोरी, काहीच क्ल्यू नाही, अचानक एक वस्तू मिळाली अन्... काय घडलं नेमकं?
धावत्या ट्रेनमधून जबरी चोरी, असा लागला छडा
| Updated on: Aug 18, 2026 | 6:31 PM

तामिळनाडूमध्ये धावत्या ट्रेनमधून थोडथोडकं नव्हे तर तब्बल 3 किलो सोनं चोरीला गेल्याची केस समोर आली आणि पोलिसही हैराण झाले. त्यांच्यासमोर मोठं आव्हानंच उभं राहिलं. मात्र चोराने केलेली एक छोटीशी चूक त्याला नडली आणि क्षणात त्याचा खेळ खल्लास झाला. ती चूक म्हणजे फेकून दिलेल्या बॅगेत असलेलं स्मार्टवॉच ! वाचून तुम्हीही चक्रावलात ना, पण हे खरं आहे. याच स्मार्टवॉचच्या मदतीने, अर्थात GPS लोकेशनने पोलिस थेट कुख्यात चोरापर्यंत म्हणजेच अमरनाथ जायस्वालपर्यंत पोहोचले. धक्कादायक गोष्ट म्हणजे अमरनाथ याच्याविरोधात यापूर्वीही ट्रेनमधील चोरीचे तब्बल 36 गुन्हे दाखल होते. खरंतर गेल्या 17 वर्षांपासून तो गुन्हेगारीपासून दूर राहिला होता, मात्र याच वर्षी त्याने पुन्हा चोरी करायला सुरूवात केली. एका ट्रेनमधून त्याने सोनं असलेली बॅग चोरली, मात्र हीच चोरी महागात पडली.

नेमकं काय घडलं?

23 जुलै रोजी 47 वर्षांचे दीपक संचेती हे मदुराईहून चेन्नई एग्मोरला जाणाऱ्या अनंतपुरी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. ते टी. नगरमधील एका दागिन्यांच्या दुकानात मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. त्या दिवशी काम आटोपून चेन्नईला परतताना त्यांच्या जवळ सुमारे 3 किलो सोनं होतं. मात्र प्रवासात त्यांचा डोळा लागला आणि जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते हादरलेच, कारण ज्यात सोनं ठेवलं होतं, ती बॅग गायब होती. त्यानंतर 24 जुलै रोजी त्यांनी तांबरम रेल्वे पोलिसांकडे धाव घेत सगळा प्रकार सांगितला आणि चोरीची तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि दीपक यांच्या बॅगेतील वस्तूंची माहिती घेतली.

तपासाला असं मिळालं निर्णायक वळण

त्याचवेळी एक महत्त्वाची बाब समोर आली – बॅगेतील एका पाउचमध्ये दीपक यांचं स्मार्टवॉच होतं. त्यानंतर पोलिसांनी स्मार्टवॉचचा GPS डेटा तपासला असता त्याचं शेवटचं लोकेशन हे त्रिची आणि विरुधाचलमदरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ आढळलं. त्यामुळे चोरीची बॅग याच परिसरात ट्रेनमधून फेकण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्यानंतर ट्रेनमधील प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली. याच तपासादरम्यान सेकंड एसी कोचमधील एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद असल्याचं पोलिसांना आढळलं. तो प्रवासी सारखा सीटवरून उठायचा आणि टॉयलेटच्या दिशेने जायचा . एवढंच नव्हे तर तो कोचच्या दरवाजाजवळही बराच वेळ उभा राहत होता, असं पोलिसांना समजलं.

पोलिसांनी प्रवाशांची यादी तपासली आणि त्या संशयिताचे नाव समोर आलं, ते म्हणजे अमरनाथ जयस्वाल. ते नाव समोर येताच पोलिसांचा संशय आणखी बळावला. कारण अमरनाथविरोधात यापूर्वी ट्रेनमधील चोरीचे तब्बल 36 गुन्हे दाखल होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचं अमरनाथने हेरलं होतं. दीपक यांना झोप लागल्यावर त्याने त्रिचीजवळ त्यांची बॅग चोरली. त्याने त्यातलं सोनं स्वतःच्या सामानात ठेवलं आणि दीपक यांची बॅग मात्र ट्रेनबाहेर फेकून दिली.

एका स्मार्टवॉचने उघड झाली जबरी चोरी

त्याला वाटले की बॅग फेकून दिल्यानंतर पुरावेही नष्ट झाले. पण त्या बॅगेत असलेली एक स्मार्टवॉच त्याच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करेल, असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. चोरी केल्यानंतर अमरनाथ पुन्हा आपल्या सीटवर जाऊन झोपला. कोणालाही संशय येऊ नये, म्हणून तो इतर प्रवाशांप्रमाणेच वागत राहिला. चेंगलपट्टूजवळ दीपक यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं, तर अमरनाथ हा तांबरम येथे ट्रेनमधून उतरला.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमरनाथसोबत आणखी दोन आरोपी या कटात सहभागी होते. या टोळीने मदुराई, चेन्नई, हैदराबाद, बिहार आणि कोलकाता जाणाऱ्या विविध ट्रेनमध्ये तिकिटं बुक करून काही प्रवाशांना लक्ष्य केलं. चोरी झाल्यावर आरोपींनी राजन कुमारशी संपर्क साधला. चोरीचं सोनं घेण्यासाठी तो कोलकाताहून विमानाने चेन्नईला आला होता. मात्र या केसचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केलं. स्मार्टवॉचनंतर मोबाईल फोनच्या लोकेशनमुळेही तपासाला मोठी मदत झाली. अखेर या केसचे धागेदोरे पश्चिम बंगालमधील सिलीगुडीपर्यंत पोहोचले. तिथेच पोलिसांनी अमरनाथला अटक केली आणि बिहारमधून राजन कुमारच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 4 लाख रुपये जप्त करण्यात आले. पोलिस याप्रकरणी आणखी दोन आरोपींचा शोध घेत आहे, चोरी केलेलं 3 लाखांचं सोन त्यांच्याकडेच असावं असा संशय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us