“माझी थट्टा केली, खिल्ली उडवली पण..”; टीव्हीकेच्या ऐतिहासिक यशानंतर थलपती विजय भावूक

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश प्राप्त केल्यानंतर अभिनेते थलपती विजय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निवडणुकीत त्यांच्या टीव्हीके पक्षाने 108 जागांवर विजय मिळवला आहे.

माझी थट्टा केली, खिल्ली उडवली पण..; टीव्हीकेच्या ऐतिहासिक यशानंतर थलपती विजय भावूक
थलपती विजय
Image Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2026 | 9:29 AM

तमिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल पहायला मिळाला आहे. तमिळनाडूतील 234 जागांपैकी अभिनेता विजय यांच्या टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी फक्त दहा जागा कमी पडत आहेत. या अभूतपूर्व यशानंतर विजय यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. टीव्हीकेवर विश्वास केल्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी राहीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. टीव्हीकेमुळे तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ पहायला मिळाली. 1967 नंतर पहिल्यांदाच डीएमके आणि एआयएडीमके व्यतिरिक्त तिसऱ्या पक्षाने सरकार स्थापन केलं आहे. “हा विजय फक्त माझ्या पक्षाचा नाही तर हे तमिळनाडूतील सुज्ञ लोकशाही विचारांचं प्रतिबिंब आहे. हा जनादेश पैसा किंवा सत्तेच्या जोरावर नाही, तर बदल हवा असलेल्या लोकांनी मिळवला आहे”, असं विजय म्हणाले.

याविषयी थलपती विजय पुढे म्हणाले, “मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली होती. सुरुवातीपासूनच मला टीका आणि टोमण्यांचा सामना करावा लागला होता. परंतु हे सर्व राजकारणाचाच एक भाग म्हणून स्वीकारलं आणि पुढे वाटचाल करत राहिलो. मला लोकांवर नेहमीच विश्वास होता आणि तोच विश्वास आजच्या विजयातून दिसून आला. पैशांचं राजकारण हळूहळू कमकुवत होत आहे. माझे चाहते माझ्यावर त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे प्रेम करतात. तरुण सदस्यांनीही या निवडणुकीत मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना विचारपूर्वक मतदान करण्यासाठी प्रेरणा दिली. टीव्हीके आता तमिळनाडूच्या राजकारणात एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आली आहे. ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही, त्यांचेही मी आभार मानतो.”

या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तमिळनाडूच्या जनतेचं आणि टीव्हीकेचं अभिनंदन केलं. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिली. तर विजय यांनीही पंतप्रधानांचे आभार मानत सांगितलं की, लोकांचं कल्याण हेच त्यांच्या पक्षाचं एकमेव ध्येय आहे. तर दुसरीकडे विजय यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी केल्याचा दावा पक्षाने केला आहे. पक्ष नेतृत्वाने तमिळनाडू शाखेला निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. काँग्रेसने तमिळनाडूमध्ये पाच जागा जिंकल्या आहेत. विजय यांचा शपथविधी 7 मे रोजी होणार आहे.

Follow Us