CUET UG परीक्षेत तांत्रिक बिघाड, पेपर 2 तास उशिराने, आता TCS ने दिलं स्पष्टीकरण!
CUET UG च्या परीक्षेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ही परीक्षा सकाळच्या सत्रात दोन तास उशिराने झाली. त्यानंतर दुपारच्या सत्रातील परीक्षेलाही दोन तास उशिराने सुरूवात झाली.

CUET UG 2026 : एकीकडे नीट पेपरफुटी प्रकणामुळे देशात अस्वस्थतेची भावना आहे. पालक, विद्यार्थी यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षांपासून विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात. अशा स्थितीत पेपरफुटी होणे चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. नीटचा पेपर एनटीएकडून आयोजित केला जातो. त्यामुळे एनटीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच कॉमन यूनिव्हर्सिटी इंन्ट्रन्स टेस्ट अर्थात CUET UG 2026 ही परीक्षा घेताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा पेपर दोन तास उशिराने सुरू झाला. ही परीक्षा एनटीएकडून टीसीएसच्या मदतीने घेतली जात होती. दरम्यान, आता टीसीएसकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
कॉमन यूनिव्हर्सिटी इंन्ट्रन्स टेस्ट आज म्हणजेच 30 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्यानंतर टीसीएसचे एमडी तथा सीईओ के. कृथिवासन यांनी निवेदन दिले आहे. आज सकाळच्या सत्रात CUET UG परीक्षेत तांत्रिक बिघाड निर्माण झाला. यामुळे सकाळच्या सत्रातील परीक्षा दोन तास उशिराने सुरू झाली. नेमकी तांत्रिक अडचण कोणती होती, हे शोधण्यात आले. तसेच ही अडचण दूरही करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय ही परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना जी अडचण झाली, त्याबद्दल आम्हाला खेद आहे, असे के कृथिवासन आपल्या निवेदनात म्हणाले आहेत.
तसेच, आमची टीम ही सर्व यंत्रणेवर काटेकोरपणे लक्ष ठेवून आहे. आम्ही एनटीएसोबत कॉम्प्यूटर बेस्ड टेस्ट कोणत्याही अडथळ्यांशिवाय घेण्यास प्रतिबद्ध आहोत, असेही के कृथिवासन म्हणाले.
परीक्षेत नेमकं काय घडलं होतं?
CUET UG च्या परीक्षेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ही परीक्षा सकाळच्या सत्रात दोन तास उशिराने झाली. त्यानंतर दुपारच्या सत्रातील परीक्षेलाही दोन तास उशिराने सुरूवात झाली. या काळात विद्यार्थ्यांची थोडी गैरसोय झाली. परंतु विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ देण्यात येईल. विद्यार्थ्यांसोबत कोणताही अन्याय होणार नाही, असे तेव्हा टीसीएसने सांगितले होते.