बड्या नेत्याचे महिलेसोबतचे फोटो व्हायरल, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

बिहारमधील तेजप्रताप यादव यांचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ते एका महिलेसोबत दिसत आहेत. मात्र हे फोटो खोटे असल्याचे तेजप्रताप यांनी सांगितलंय.

बड्या नेत्याचे महिलेसोबतचे फोटो व्हायरल, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?
tej pratap yadav and anushka yadav
| Updated on: May 25, 2025 | 6:02 PM

Tej Pratap Yadav : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी मोठा खुलासा केला आहे. ते गेल्या 12 वर्षांपासून एका महिलेसोबत रिलेशनमध्ये असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे या निर्णयानंतर त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर मात्र तेज प्रताप यादव यांनी समोर आलेले फोटो हे एआयने तयार केलेले आहेत, असा दावा केला आहे. याच कारणामुळे तेजप्रताप यादव यांचे नेमके कोणते फोटो समोर आले, तसेच त्यांच्या कुटुंबाने नेमका काय निर्णय घेतला? एकूणात हे प्रकरण नेमके काय आहे? असे विचारले जात आहे.

नेमके प्रकरण काय?

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजप्रताप यादव यांनी शनिवारी म्हणजेच 24 मे रोजी त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ते एका महिलेसोबत होतो. याच महिलेसोबत मी गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनमध्ये असल्याचं तेजप्रताप यादव यांनी जाहीर केलं होतं. मी तेजप्रताप यादव आहे आणि माझ्याोबत जी महिला दिसत आहे त्या महिलेचे नाव अनुष्का यादव असे आहे. आम्ही गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो तसेच आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. गेल्या 12 वर्षांपासून आम्ही रिलेशनमध्ये आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून मला तुम्हाला ही माहिती द्यायची होती. परंतु नेमकं कसं सांगावं हे समजत नव्हतं. त्यामुळे आज मी या पोस्टच्या माध्यमातून माझ्या मनातली गोष्ट तुमच्यासमोर मांडतो आहे. तुम्ही मला समजून घ्याल, अशी आशा करतो, असे तेजप्रताप यादव यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन

मात्र तेजप्रताप यादव यांची ही पोस्ट समोर येताच बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. तेजप्रताप यादव यांच्यासोबतची ही महिला नेमकी कोण आहे असे विचारले जाऊ लागले. विशेष म्हणजे हे फोटो समोर आल्यानंतर तेजप्रताप यादव यांचे वडील तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. तेजप्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. तसेच मी त्यांना माझ्या कुटुंबापासूनही दूर करतोय. आमचा पक्ष तसेच कुटुंबात त्यांची कोणतीही भूमिका नसेल, असं लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलंय.

फोटो खोटे असल्याचा आरोप

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांची ही भूमिका समोर आल्यानंतर तेजप्रताप यादव यांनी माझ्या खात्यावर पोस्ट झालेले फोटो हे खोटे असल्याचं म्हटलंय. तसेच समोर आलेले फोटो एआय जनरेटेड आहेत. मला तसेच माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. माझे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात आले आहेत, असे तेजप्रताप यादव यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी ते फोटोही सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत.