भारतात आणखी दोन-तीन महिने लसींचा तुटवडा जाणवणार: अदर पुनावाला

| Updated on: May 03, 2021 | 12:22 PM

कोविशिल्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून गंभीर स्वरूपाचे फोन कॉल्स | Adar Poonawalla covid vaccine

भारतात आणखी दोन-तीन महिने लसींचा तुटवडा जाणवणार: अदर पुनावाला
अदर पुनावाला, सीईओ, सिरम
Follow us on

नवी दिल्ली: भारतात आणखी दोन-तीन महिने कोरोना लसींचा तुटवडा जाणवत राहील, असे मत सिरमचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी व्यक्त केले. साधारण जुलैपर्यंत अशीच परिस्थिती राहतील. सध्याच्या घडीला सिरम इन्स्टिट्यूट महिन्याला 60 ते 70 कोटी लसींची उत्पादन करत आहे. जुलै महिन्यापर्यंत ही क्षमता 100 कोटींपर्यंत पोहोचेल, असे अदर पुनावाला यांनी म्हटले. (India could face vaccine crunch for 2-3 months says Serum CEO Adar Poonawalla)

अदर पुनावाला सध्या परदेशात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘टाईम्स’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीने आता उद्योजकांच्या मनात धडकी भरवली आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून गंभीर स्वरूपाचे फोन कॉल्स येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

‘अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली’

शिवसेनेतील काही गुंडांनी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांना धमकावले. त्यामुळे अदर पुनावाला परदेशात निघून गेले, असे वक्तव्य ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भात इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवून राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात सुभाष देसाई यांनी नमूद केले आहे की, राहुल कनवाल यांनी तुमच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कनवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुभाष देसाई यांनी पत्रात केली आहे.

संबंधित बातम्या:

केंद्राचे सुरक्षारक्षक अदर पूनावालांची रेकी करत आहेत काय?; नाना पटोलेंचा केंद्राला गंभीर सवाल

अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली; ‘त्या’ वक्तव्यावर सुभाष देसाईंचा आक्षेप

(India could face vaccine crunch for 2-3 months says Serum CEO Adar Poonawalla)