
रस्ते सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे अनेकदा अपघात घडतात. यात अनेकांचा मृत्यूही होतो. त्यामुळे या नियमांबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी पोलिस सतत मोहीमा राबवत असतात. नियम तोडणाऱ्यावर कॅमेऱ्याच्या माध्यमातून बारीक नजर ठेवली जात आहे. काहीजण विना हेल्मेट प्रवास करतात. त्यामुळे दंड टाळण्यासाठी लोक हेल्मेट घालतात. मात्र तुम्ही हेल्मेट घातले असेल मात्र काही नियम माहित नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बाईक चालवताना हेल्मेट घालण्याचे काही नियम आहेत. अनेकजण कोणतेही हेल्मेट वापरतात, पण वाहन चालवताना वापरले जाणारे हेल्मेट भारतीय मानक ब्युरोने (BIS) ठरवलेल्या मानकांनुसार असणे आवश्यक आहे. जर एखादा दुचाकीस्वार ISI मार्क नसलेले हेल्मेट घालून दुचाकी चालवताना पकडला गेला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. दुचाकी चालकाकडून 1000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. अधिकाऱ्यांच्या मते, रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे एक मोठे कारण म्हणजे मानकांनुसार हेल्मेटचा वापर न करणे हे आहे. त्यामुळे पोलिसांकडून असे हेल्मेट वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय मानक IS 4151:2015 नुसार तयार केलेले हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. हा मानक हेल्मेटची गुणवत्ता, मजबुती आणि सुरक्षितता लक्षात घेऊन ठरवण्यात आला आहे. बाजारात अनेक हेल्मेट असे विकले जातात जे फक्त दिसायला हेल्मेटसारखे असतात, पण अपघाताच्या वेळी डोक्याचे योग्य संरक्षण करू शकत नाहीत. अशा हलक्या आणि मानक नसलेल्या हेल्मेटचा वापर केला तर अपघातावेळी इजा होण्याची शत्यता नाकारता येत नाही.
पोलिसांच्या मते, जर एखादा दुचाकी चालक ISI मानकांनुसार नसलेले हेल्मेट वापरताना आढळला तर त्याला 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच हेल्मेट तपासणीदरम्यान पोलीस हेही पाहतात की, हेल्मेट योग्य प्रकारे घातले आहे की नाही. हेल्मेट सैल घातले असेल किंवा त्याचा पट्टा व्यवस्थित लावलेला नसेल तरीही कारवाई होऊ शकते. त्यामुळे योग्य मानक असलेले आणि योग्यरित्या घातलेले हेल्मेट घालणे महत्त्वाचे आहे. अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.