ट्रेन उशिरा आली म्हणून परिक्षेला जाणारे विद्यार्थी संतापले, केली दगडफेक.. थेट IG घायाळ

परीक्षेसाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीची विद्यार्थांनी तोडफोड केली. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या.

ट्रेन उशिरा आली म्हणून परिक्षेला जाणारे विद्यार्थी संतापले, केली दगडफेक.. थेट IG घायाळ
patliputra station
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 14, 2026 | 8:07 AM

परिक्षा म्हटली की विद्यार्थांची तारंबळ उडलेली असते. मग ती शाळेतील परिक्षा असो वा कॉलेजमधील. प्रत्येक विद्यार्थावर प्रेशर हे असतंच. पेपर कसा जाईल, आपण अभ्यास केलेल्या गोष्टी परिक्षेत विचारल्या जातील ना? आपल्याला परिक्षेत चांगले मार्क मिळतील ना? पेपर लिहित असताना आपल्याला प्रश्नांची उत्तरे आठवतील ना? अशा अनेक गोष्टी विद्यार्थांच्या मनात असतात. पण परिक्षेला जातानाच उशिर झाला तर विद्यार्थी प्रचंड घाबरतात. काय करावे आणि काय करु नये? असा प्रश्न त्यांना पडतो. असेच काहीसे एका रेल्वे फलाटावर झाले आहे. परिक्षेला जाण्यासाठी जी ट्रेन पकडायची होती ती ट्रेन उशिरा आल्यामुळे विद्यार्थी संतापले.

कुठे घडली घटना?

रविवारी पटण्यातील पाटलिपुत्र रेल्वे स्टेशनवर असेच काही घडले. बिहार पोलिस निर्बंध विभागाच्या परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांचे विरोध प्रदर्शन रेल्वे उशिरा आल्यामुळे आणखी हिंसक झाले. ट्रेन व्यवस्थेबाबत नाराज उमेदवारांनी मोठा गोंधळ घातला आणि परीक्षेसाठी चालवलेल्या विशेष ट्रेनमध्ये तोडफोड केली. परिस्थिती बिघडल्याने पोलिसांना श्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या, लाठीचार्ज करावा लागला आणि इशारा म्हणून हवेत फायरिंग करावी लागली.

समोर आलेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी स्टेशनवर जमा झाले होते. यावेळी ट्रेनच्या व्यवस्थेबाबत नाराजी वाढली आणि काही लोकांनी विरोध प्रदर्शन सुरू केले. लगेचच प्रकरणाने उग्र रूप धारण केले आणि प्रदर्शनकर्त्यांनी ट्रेनमध्ये तोडफोड केली तसेच रेल्वे वाहतूक बाधित करण्याचा प्रयत्न केला.

आयजीसह अनेक पोलिस कर्मचारी जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गर्दी शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना बलप्रयोग करावा लागला. यात आयजीसह अनेक अधिकाऱ्यांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर स्टेशन परिसर आणि आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पाटलिपुत्र रेल्वे स्टेशन परिसरात दगडफेकीच्या घटनेनंतर तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पटण्याचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन यांनी सांगितले की, रात्री उशिरा माहिती मिळाली होती की काही लोक स्टेशनवर गोंधळ घालत आहेत. प्रशासनाने त्यांना शांतता राखण्याची आणि परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या इतर उमेदवारांना सहकार्य करण्याची विनंती केली होती. मात्र काही असामाजिक घटक सतत इमर्जन्सी चेन ओढत होते आणि अतिरिक्त विशेष ट्रेनची मागणी करत होते. तरी आधीच दोन विशेष ट्रेन उपलब्ध होत्या.

डीएम म्हणाले की, काही लोकांनी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या उमेदवारांनाही अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना हलका बलप्रयोग करावा लागला. त्यांनी सांगितले की, आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली आहे, सर्व नियोजित ट्रेन रवाना झाल्या आहेत आणि रेल्वे वाहतूकही सामान्य रूपाने सुरू आहे.

Follow Us