एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
या गावात मुलं जन्माला येताच त्यांच्या कानामध्ये ऐकवले जाते या प्रसिद्ध गायकाचे नाव. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितला त्या गायकाचा खास किस्सा.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्गज गायक-अभिनेते किशोर कुमार यांनी अनेकदा एकत्र काम केले. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधही होते. आता ‘कौन बनेगा करोडपती सीजन 18’च्या आगामी भागात अमिताभ बच्चन किशोर कुमार यांच्या काही खास आणि मजेशीर आठवणींना उजाळा देताना दिसणार आहेत.
या कार्यक्रमात अमिताभ यांनी किशोर कुमार यांचे मनमोकळेपणाने कौतुक केले. किशोर कुमार हे अत्यंत दिलदार व्यक्ती होते आणि त्यांच्याशी जेव्हा जेव्हा भेट झाली, तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने स्वागत केल्याचे अमिताभ यांनी सांगितले. तसेच त्यांना किशोर कुमार यांच्यासोबत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बसण्याची संधी मिळाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
किशोर कुमार यांचा भन्नाट कॅसेट संग्रह
अमिताभ बच्चन यांनी किशोर कुमार यांच्या घरी झालेल्या एका भेटीचा किस्साही सांगितला. त्या काळात व्हिडीओ कॅसेट्सचा मोठा जमाना होता. किशोर कुमार यांना विविध चित्रपट आणि व्हिडीओ कॅसेट्स जमा करण्याचा विशेष छंद होता. त्यांनी अमिताभ यांना आपल्या घरी बोलावून जगभरातील चित्रपट आणि व्हिडीओ कॅसेट्सचा संग्रह आवर्जून दाखवला होता. आपल्या या संग्रहाबद्दल किशोर कुमार अतिशय उत्साही आणि अभिमानी होते, अशी आठवण अमिताभ यांनी सांगितली.
किशोर कुमार यांच्या स्वभावातील मजेशीर बाजूही अमिताभ यांनी एका किस्स्यातून सांगितली. एकदा अमिताभ यांनी किशोर कुमार यांना फोन केला आणि स्वतःची ओळख करून देताना, ‘मी अमित बोलतोय,’ असे म्हटले. मात्र, आवाज ऐकून किशोर कुमार यांनी फोनवर त्यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार बोलत असल्याचे समजले. या मजेशीर गैरसमजाची आठवण सांगताना अमिताभ यांनी किशोर कुमार यांच्या साध्या आणि दिलखुलास स्वभावाचा उल्लेख केला.
खंडव्यात आजही किशोर कुमार यांचे विशेष स्थान
‘कौन बनेगा करोडपती 18’मध्ये किशोर कुमार यांचे जन्मस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील खंडवा येथील स्पर्धक वीरेंद्र जायसवालही सहभागी होणार आहेत. त्यांनी किशोर कुमार आणि खंडवा यांच्यातील भावनिक नाते सांगितले.
खंडव्यात आजही 4 ऑगस्ट रोजी किशोर कुमार यांचा जन्मदिवस विशेष उत्साहात साजरा केला जातो. विविध भागांमध्ये त्यांची गाणी गायली जातात. इतकेच नव्हे, तर एखाद्या घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या कानावर सर्वप्रथम ‘किशोर’ हे नाव ऐकवले जाते, असेही वीरेंद्र यांनी सांगितले.
