भीतीमुळे सगळं बंद केलं…; जंतरमंतर आंदोलनावरून सीजेपी नेत्यांकडून मोदी सरकारला लक्ष्य, इंदिरा गांधींच्या आणीबाणीचीही आठवण
Jantar Mantar CJP Protest News: सीजीपेचे आंदोलन उद्या जंतरमंतरवर धडकणार आहे. पण त्याआधीच मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दास, रांका अन् दिपकेंनी एका व्हिडिओतून खोचक टोले लगावले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने उद्या (शनिवार, १० ऑक्टोबर) दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी सीजेपीला जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. तरीही जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. तसेच दिल्लीला जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता यावर अभिजीत दिपकेंनी एका व्हिडिओतून टीका केली आहे. त्यांनी सरकारवर निशाणा साधत खिल्ली उडवली आहे.
या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे स्थगित न करण्याचे किंवा दिल्ली मेट्रो स्थानके बंद न करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास टाळण्यासाठी केंद्र सरकारने नियंत्रित पद्धतीने सेवा सुरू ठेवाव्यात, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तरीही दिल्ली मेट्रोची ५७ स्थानके आज रात्री ९ वाजल्यापासून शनिवारपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच दिल्लीत येणाऱ्या आणि रद्द झालेल्या बहुतांश गाड्या दिल्लीहून परत जातानाही रद्द केल्या जात आहेत. यावर अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके म्हणाले की, उद्या आम्ही जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी जाणार आहोत. पण त्याआधीच ५६ इंचाच्या महामानवाने रेल्वे बंद केल्या आहेत. यावर सौरव दास म्हणाले, नरेंद्र मोदी जो माहोल बनवत आहेत तो चांगला आहे. यानंतर यावर आशुतोष रांका म्हणाले, मोदी जी तुमची प्रकृती तर ठीक आहे ना तुमची? काही अडचण नाही ना? यानंतर पुन्हा निशाणा साधत दिपके म्हणाले की, मोदी जी वेळेवर बीपी तपासत राहा.
Get well soon paw-paw https://t.co/48w6eyzKXH
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 9, 2026
यानंतर सौरव दास म्हणाले की, आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधींनी रेल्वे बंद केल्या नव्हत्या. भीतीमुळे सर्व बंद केलं आहे. यावर आशुतोष रांका म्हणाले, आता मला सचिन शर्मांचा चेहरा बघायचा आहे. त्यानंतर अभिजीत दिपके म्हणाले, जनरल डायर उद्या आम्ही येतो. भेटू उद्या, असं म्हणत या तिघांनीही सरकारची खिल्ली उडवली आहे. ह्या व्हिडिओनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.