
TVK Vijay Rally Stampede : तमिळनाडूच्या करूर इथं ‘तमिलगा वेत्री कळ्ळगम’ (TVK) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्या सभेत गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरीत किमान 36 जणांचा मृत्यू झाला. यात आठ बालकं आणि 16 महिलांचा समावेश आहे. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. सभेसाठी 30 हजार नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षात 60 हजारांवर नागरिक सभास्थळी उपस्थित होते. विजय यांचं भाषण सुरू होतं, त्यावेळी जमावाने व्यासपीठाच्या दिशेने धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली. यात पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक आणि बालके बेशुद्ध पडली. विजय यांनी पोलिसांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. व्यासपीठावरून त्यांनी पाण्याच्या बाटल्याही पुरवल्या. त्यानंतर त्यांनी भाषण थांबवलं.
तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “ही अत्यंत दु:खद घटना आहे. या घटनेनंतर मी पोलिसांनी उचललेल्या पावलांचा आढावा घेतला आहे. याआधी टीव्हीकेच्या रॅलीमध्ये कमी गर्दी असायची. परंतु यंदा अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमले. आयोजकांनी करूर इथं एका मोठ्या मैदानाची मागणी केली होती आणि जवळपास 10 हजार लोक जमण्याची अपेक्षा होती. ज्याठिकाणी विजय जनतेला संबोधित करणार होते, तिथे 500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते,” असं त्यांनी सांगितलं.
जी. वेंकटरमण यांनी सांगितलं की सभेसाठी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. परंतु सकाळी 11 वाजल्यापासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली. “जेव्हा विजय संध्यकाळी 7.40 वाजता त्याठिकाणी पोहोचले, तेव्हा जमाव तिथं जेवण आणि पाण्याच्या सोयींविना तासनतास प्रतीक्षा करत होता. विजय यांनी स्वत: पोलिसांच्या भूमिकेचं कौतुक केलं. परंतु गर्दी व्यवस्थापनाची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी यावर त्यांनी भर दिला. या दु:खद घटनेमागील कारणं चौकशीनंतरच कळू शकतील. त्यासाठी एक सदस्यीय आयोग आधीच स्थापन करण्यात आला आहे”, असं ते पुढे म्हणाले. तसंच नातेवाईकांना दहा लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.