
महिलांची सुरक्षा आणि शांती व्यवस्थेबाबत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानवर जोरदार कडाडून हल्ला चढवला. UN मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी असलेले पर्वथनेनी हरीश म्हणाले की, पाकिस्तान फक्त खोटे बोलून जगाचं लक्ष विचलित करतं. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील महिलांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत, 1971 साली झालेल्या ऑपरेशन सर्चलाइटचा उल्लेख केला. या ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानी सैन्याने अंदाजे 4,00,000 महिलांवर सामूहिक बलात्कार केले, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
UNSC मध्ये महिला, शांतता आणि सुरक्षा या विषयावरील खुली चर्चा सुरू असतानाच पर्वथनेनी हरिश यांनी हे विधान केलं. UNSCमध्ये ही बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. देशात शांतता प्रस्थापित करण्यात महिलांची भूमिका आणि त्यांच्या सुरक्षिततेवर यामध्ये चर्चा केली जाते.
पाकिस्तान जगाचं लक्ष करतं विचलित
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) चर्चेदरम्यान, हरीश यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. “पाकिस्तान दरवर्षी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतावर जोरदार टीका करतो, विशेषतः जम्मू आणि काश्मीरबाबत, ज्याचा ते शस्त्र म्हणून वापर करतात आणि ज्यावर वारंवार हल्ला केला जातो.” असं ते म्हणाले. ” पाकिस्तान हा एक असा देश आहे जो स्वतःच्या देशात बॉम्बस्फोट घडवून आणतो आणि नरसंहार करतो. असा देश केवळ जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा, त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतो.” असंही हरीश यांनी सुनावलं.
#WATCH | At the UNSC Open Debate on Women Peace and Security, Permanent Representative of India to the UN, Parvathaneni Harish says, “Every year, we are unfortunately fated to listen to the delusional tirade of Pakistan against my country, especially on Jammu and Kashmir, the… pic.twitter.com/KngC3ku98O
— ANI (@ANI) October 7, 2025
महिलांवर सामूहिक बलात्कार
पाकिस्तानला खडे बोल सुनावतानाच हरीश यांनी महिला सुरक्षेबाबत पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सर्चलाइटचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पाकिस्तान हा तोच देश आहे ज्याने 1971साली ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले होते, जिथे त्यांच्याच सैन्याने अनेक नागरिकांना ठार मारलं. एवढंच नव्हे तर सुमारे 4 लाख महिलांवर पाकिस्तानी सैन्याने सामूहिक बलात्कार केला होता, असं ते म्हणाले. पाकिस्तानचा हा खोटा प्रचार जगाच्या लक्षात आला आहे, असंही हरीश यांनी सुनावलं.
भारत महिला शांती सैनिकांना देतो प्रोत्साहन
तर महिला शांती सैनिकांना प्रोत्साहन देण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे हरीश म्हणाले. यासंदर्भात उदाहरण देत ते म्हणाले की, भारतातील पहिल्या आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी या 2003 साली संयुक्त राष्ट्रांच्या पोलिस विभागाच्या पहिल्या महिला पोलिस सल्लागार बनल्या. “मला वाटतं की आता प्रश्न हा नाही की महिला शांती मोहिमांमध्ये काम करू शकतात का? तर त्याऐवजी, महिलांशिवाय शांती मोहिमा शक्य आहेत का?” असा प्रश्न आहे, असं त्यांनी नमूद केलं.
शांतता मोहिमेमध्ये महिलांच्या सहभागाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या लैंगिक हिंसाचार दूर करण्यात मदत करतात आणि शांतता प्रक्रिया समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल, याचीही त्या काळजी घेतात, असं हरीश म्हणाले. ते महिला शांती सैनिक ‘शांतीच्या दूत’ आहेत असे परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणतात, असंही त्यांनी नमूद केलं.