
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं आपल्या अटी मान्य कराव्यात यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं हे एक दबावतंत्र असल्याचं बोललं जात आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. मात्र भारतानं देखील ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. भारत सरकारनं उघडपणे ट्रम्प यांच्या या दादागिरीविरोधात भूमिका घेतली आहे. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकर्यांच्या हितासोबत तडजोड करणार नाही. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्रम्प यांचं नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे, काही लोक बॉस बनण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टॅरीफ संदर्भात केलंलं विधान चांगलंच चर्चेमध्ये आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं?
आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचं हीत महत्त्वाचं आहे, भारत सरकार कधीच आपल्या शेतकऱ्यांसोबत, पशुपालकांसोबत आणि मच्छिमार बांधवांच्या हितासोबत तडजोड करणार नाही. मला माहिती आहे, याची मोठी किंमत मोजावी लागेल, मात्र त्यासाठी आम्ही तयार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. काही लोक स्वत:ला जगाचा बॉस समजतात. त्यांना भारत प्रगती करत आहे, हे पहावत नाही. काही लोकांना वाटतं की भारतामध्ये तयार झालेल्या वस्तू, भारतीयांनी तयार केलेल्या वस्तू या त्यांच्या देशात अधिक महाग झाल्या पाहिजेत. जर या वस्तू महाग झाल्या तर कोणीही त्या वस्तू खरेदी करू शकणार नाही, असं त्यांना वाटतं. पण मी पूर्ण विश्वासानं सांगतो की आता जगातील कोणतीच ताकद भारताला महासत्ता होण्यापासून रोखू शकत नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान राजनाथ सिंह यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गडकरी?
श्रीमंत देश दादागिरी करतात, आज जे दादागिरी करत आहेत ते केवळ यामुळे की ते आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत म्हणून, त्यांच्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे म्हणून ते दादागिरी करतात. मात्र त्यांच्यापेक्षा जर चांगले संसाधनं आणि तंत्रज्ञान जर आमच्याकडे आले तर आम्ही दादागिरी करणार नाही. कारण आम्हाला आमची संस्कृती विश्वाच्या कल्याणाची शिकवण देते. जर आम्हाला विश्वगुरू व्हायचं असेल तर आमच्या शास्त्रज्ञांना आणि अभियंत्यांना त्या दिशेनं प्रयत्न करावे लागतील, मला नाही वाटत की आम्हाला कोणाकडे जावं लागेल असं गडकरी यांनी म्हटलं आहे, दरम्यान भारताच्या तीनही महत्त्वाच्या पदावर असलेल्या या नेत्यांची ही वक्तव्य पाहिल्यानंतर भारत आता अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतो असं बोललं जात आहे. दरम्यान दुसरीकडे भारत अमेरिकेमधील काही ठराविक वस्तुंवर प्रत्युत्तर टॅरिफ लावण्याच्या तयारीमध्ये असल्याचं देखील बोललं जात आहे.