विचित्रच… लग्नात नागिन धूनवर थिरकत होते, अचानाक लांबसडक साप आला, तरुणाला डसला; अन्…
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका लग्नसमारंभात धक्कादायक घटना घडली. नागिन धूनवर नाचत असताना एक साप अचानक आला. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना एका तरुणाला त्याने डसले, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आनंदाच्या क्षणातच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही हृदयद्रावक घटना सर्वांना हादरवून गेली आहे.

मृत्यू कधी आणि कसा येईल हे कुणालाच सांगता येत नाही. कुणाचा शेवटचा दिवस कधी असेल याची काहीच शाश्वती नाही. दुर्धर आजार असलेला व्यक्ती आता जाणारच असं वाटतं तेव्हा तो चमत्कारिकरित्या बरा होतो. आणि धडधाकट वाटणारा माणूस अचानक जातो, तेव्हा काळजात धस्स होतं. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये अशीच एक घटना घडली आहे. घरात लग्न होतं म्हणून सर्वजण आनंदात होते. नागिन धूनवर सर्वांचेच पाय थिरकले होते. नागिनचं गाणं सुरू असतानाच अचानक एक साप आला आणि त्याने तरुणाला दंश केला. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जिथे आनंदाचं वातावरण होतं, तिथे मातम सुरू झालं आहे.
उन्नाव जिल्ह्यातील एका लग्नाच्या कार्यक्रमात ही धक्कादायक घटना घडली. हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे नागिन धून वाजवण्यात आली. सर्वच जोशात होते. जोरदार थिरकत होते. मस्ती मजाक सुरू होती. काही तरुण नागिन धूनवर वेडेवाकडे चाळे करत नाचत होते. इतक्यात एक विषारी साप आला. त्यामुळे एकच घबराट निर्माण झाली. सर्वत्र पळापळ सुरू झाली. त्यावेळी शेजारच्या एका तरुणाने सापाला पकडून त्याला हटवण्याचा प्रयत्न केला. पण सापाने त्याला दंश केला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वच हादरून गेले.
अन् तोंडचं पाणीच पळालं
अजगैन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कब्जा गावात ही घटना घडली. देवराज द्विवेदी यांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रमही सुरू होता. संगीत कार्यक्रमात महिलांचं नाचगाणं सुरू होतं. तेव्हा नागिन धून वाजवण्यात आली. त्यामुळे सर्वच जोशात आले आणि नागिण सारखा डान्स करू लागले. नागिन धून वाजत असतानाच अचानक एक लांब सडक साप आला आणि तो रेंगाळू लागला. आधी लोकांना नवल वाटलं. पण फार उशिरापर्यंत साप रेंगाळतच राहिल्याने सर्वांनाच्या तोंडचं पाणी पळालं.
धाडस अंगाशी आलं…
या ठिकाणी शेजारी राहणारा 26 वर्षीय अर्जुनही डान्स करत होता. साप पाहिल्यावर सर्वच घाबरले होते. अर्जुनने धाडस दाखवून या सापाला पकडलं आणि त्याला बाहेर घेऊन जाऊ लागला. त्यावेळी अचानक सापाने त्याला दंश केलं. त्यामुळे त्याची हालत बिघडली. स्थानिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण त्याची प्रकृती अधिकच गंभीर होत होती. त्यामुळे त्याला लखनऊच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांवरच आभाळ फाटलं. आनंदच्या ठिकाणी आक्रोश आणि रडारड सुरू झाली. मुलगा अचानक गेल्याने कुटुंबाचे रडून रडून हाल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
