CM योगींचा धडाकेबाज निर्णय, आणखी एका शहराचे नाव बदललं, मुस्तफाबाद आता ‘या’ नावाने ओळखलं जाणार

Mustafabad Renamed Kabirdham : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी जिल्ह्यांतील येथील मुस्तफाबाद येथील विश्व कल्याण आश्रमाला भेट दिली. यावेळी योगींनी मुस्तफाबादचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे.

CM योगींचा धडाकेबाज निर्णय, आणखी एका शहराचे नाव बदललं, मुस्तफाबाद आता या नावाने ओळखलं जाणार
Yogi Aadityanath
| Updated on: Oct 27, 2025 | 4:25 PM

लखीमपूर खेरी, 27 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी जिल्ह्यांतील येथील मुस्तफाबाद येथील विश्व कल्याण आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्मृती प्रकाटोत्सव मेळाव्यातही भाग घेत पूज्य संतांना आदरांजली वाहिली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ‘डबल इंजिन सरकारच्या काळात राज्यातील धार्मिक स्थळांचा पुनरुद्धार आणि विकास केला जात आहे. पूर्वी या पैशातून कब्रस्तानच्या सीमा बांधल्या जात होत्या. यावेळी योगींनी मुस्तफाबादचे नाव बदलून कबीरधाम असे करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुस्तफाबादचे नाव आता कबीरधाम असे असणार आहे. याबाबत बोलताना योगींनी सांगितले की, ‘मागील सरकारच्या काळात अयोध्येचे नाव फैजाबाद, प्रयागराजचे नाव अलाहाबाद आणि कबीरधामचे नाव मुस्तफाबाद असे ठेवण्यात आले होते. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली विरोधक हे करत असत, मात्र हे एक ढोंग आहे. मात्र आम्ही या ठिकाणांची ओळख पटवून त्यांचा विकास करण्याचे काम केले.

संत कबीरदासांचे विचार समाजासाठी फायदेशीर

कबीरधाम आश्रमातील या कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी देशभक्ती, सनातन परंपरा, वारशाचे जतन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या भूमिकेवर भाष्य केले. योगी म्हणाले की, ‘संत कबीरदासांचे शब्द आजही समाजाला मार्गदर्शन करतात. त्यांनी भक्तीचा एक प्रवाह सोडला ज्याने सामाजिक विषमता मोडून काढण्यासोबत आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंध सोप्या भाषेत स्पष्ट केले.

मुख्यमंत्री योगी पुढे बोलताना म्हणाले की, गुरु गोविंद दोनो खडे काके लगून पाओं… ही ओवी आजही आपल्याला गुरुचे सांगते. संतांचे शब्द शेकडो वर्षांपूर्वी जितके प्रासंगिक होते तितकेच आजही प्रासंगिक आहेत. कबीरदासजींनी त्यांच्या काळात समाजातील जातीभेदांवर टीका करताना म्हटले होते की, “जात पाटी पुछे न कोई, जो हरी पूजतो तो हरी बनतो.” ही ओवी आपल्या समाजाच्या एकता आणि अखंडतेचा पाया आहे.

राष्ट्राच्या एकता बाधित करणाऱ्यांविरोधात सतर्क राहण्याची गरज

योगी आदित्यनाथ यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘राष्ट्राच्या एकतेला बाधा आणणाऱ्या शक्तींविरुद्ध आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. आजही समाजविघातक शक्ती जातीच्या नावाखाली फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण वेळीच हे ओळखले नाही तर हे लोक समाजाला नष्ट करतील. देशभक्ती ही सर्व समस्यांवर उपाय आहे. “माता भूमी पुत्रोहम…” ही भूमी केवळ मातीचा तुकडा नाही; ती आपली मातृभूमी आणि पितृभूमी आहे. या भूमीची सेवा करणे हीच खरी पूजा आहे.

भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात परिवर्तन घडत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 2014 पूर्वी देश अनेक संकटाशी झुंजत होता. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि फुटीरतावादी राजकारणाने कळस गाठला होता. मात्र मोदींच्या नेतृत्वात सर्वकाही बदलत आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आता अर्थव्यवस्था पुढील काही महिन्यांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे.

धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारामुळे पर्यटन वाढले

लखीमपूर खेरी हा एक सीमावर्ती जिल्हा आहे. या ठिकाणीही विकास होत आहे. यावर बोलताना योगी म्हणाले की, ‘गावांमध्ये रस्ते बांधले जात आहेत, वैद्यकीय महाविद्यालये उभारली जात आहेत. विमानतळांचा विस्तार होत आहे आणि इको-टुरिझमला चालना दिली जात आहे. गोला गोकर्णनाथ धाम आणि कबीरधाम या धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारामुळे पर्यटन वाढले आहे.’

पुढे बोलताना योगींनी संत असंगदेव जी महाराजांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, ते धर्म, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय जाणीवेच्या क्षेत्रात चांगले काम करत आहेत. अंमली पदार्थांचे व्यसन हे विनाशाचे कारण आहे. परदेशी शक्ती आपल्या तरुणांना नष्ट करण्याचा कट रचत आहेत. फोनचा वापर कमी करा आणि विकासावर लक्ष केंद्रित करा. या कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी छठ महापर्वाच्या निमित्ताने राज्य आणि देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच सद्गुरु कबीर पूज्य श्री असंगदेव जी धर्मशाळेचे भूमिपूजन देखील केले.

या कार्यक्रमाला असंगदेव जी महाराज, मंत्री राकेश सचान, नितीन अग्रवाल, मन्नुलाल कोरी, आमदार अमन गिरी, रोमी साहनी, लोकेंद्र प्रताप सिंह, शशांक वर्मा, योगेश वर्मा, विनोद शंकर अवस्थी, मंजू त्यागी, सौरभ सिंह सोनू, महामंडलेश्वर प्रवक्तानंद आणि संत आणि भक्त उपस्थित होते.

Follow Us