UP Floods : दर तासाला वाढणार यमुनेची पाणीपातळी; दिल्लीत नदीचं पाणी पात्राबाहेर, पुराचा अलर्ट

मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि प्रमुख नोकरशहांची कार्यालये असलेल्या दिल्ली सचिवालयाजवळही पुराचं पाणी पोहोचलं आहे. मयूर विहार फेज एकचा सखल भाग पाण्याखाली गेला असून मठ बाजार आणि यमुना बाजारसारखे क्षेत्रही पाण्याखाली होते.

UP Floods : दर तासाला वाढणार यमुनेची पाणीपातळी; दिल्लीत नदीचं पाणी पात्राबाहेर, पुराचा अलर्ट
उत्तर प्रदेशात पूरस्थिती
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2025 | 9:27 AM

नवी दिल्ली, पंजाब आणि जम्मूमध्ये आलेल्या पुरामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंजाबमध्ये भाक्रा धरणाची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. तर सतलज नदीजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे पाणी साचण्याच्या समस्येमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. त्यातच यमुना नदीची पाण्याची पातळी वाढल्याने पूर आला आहे. शहरातील जुन्या रेल्वे पुलावरील यमुना नदीची पाण्याची पातळी 207.47 मीटरवर पोहोचली आहे. पावसामुळे जवळपासचा परिसर आणि मदत शिबिरं पाण्याखाली गेली आहेत. गोकुळ बॅरेजमधून एक लाख क्युसेकचा सततचा विसर्ग आणि मथुरा-आग्रादरम्यान सुरू असलेला पाऊस यांमुळे यमुना नदीची पाण्याची पातळी वाढली आहे.

आता यमुना नदीची पाण्याची पातळी दर तासाला वेगाने वाढेल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बुधवारी आग्रामध्ये या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस पडला. शहरातील रस्ते आणि बाजारपेठा जलमय झाल्या. वाहतूक व्यवस्था कोलमडली. गेल्या तीन दिवसांपासून इथं मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे यमुनाही पूरग्रस्त आहे. ग्रामीण आणि सखल भागात पाणी साचलं आहे.

एनडीआरएफने काही भागात बोटी वापरून तर काही भागात गुडघ्यापर्यंत पाण्यातून प्रवास करून पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना वाचवलं. यमुना बाजार आणि मयूर विहार फेज एकच्या काही भागातील लोकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. पुरामुळे त्यांना त्यांची घरं सोडावी लागली. सरकारी शाळांमध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागला. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर संस्थांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

शुक्रवारी पुन्हा मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यमुनेचा परिसरच नाही तर संपूर्ण शहरातील रस्त्यांचं तलावात रुपांतर झालं आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गावरही पाणी साचलंय. सुलतानगंज कल्व्हर्टसमोर, महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर, शंकरगड कल्व्हर्ट, केदार नगर, राम नगर कल्व्हर्ट, मारुती इस्टेट रोड, मानस नगर, साकेत कॉलनी, आवास विकास कॉलनी, उखरा रोड, यमुना तीर, बालकेश्वर, कमला नगर, लोहा मंडी, तोता का ताल, कैलाशपुरी रोड, एमजी रोड परिसरात पाणी साचलं आहे.