Weather Update : 2027 मधील पावसाचा पहिला अंदाज समोर, एल निनोने टेन्शन वाढवलं, मोठा इशारा
मोठी बातमी समोर येत आहे, एल निनोचा प्रभाव आता आणखी वाढत जाणार असून, जागतिक हवामान संस्थेकडून ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुढेच्या वर्षी एल निनोचा प्रभाव कधीपर्यंत राहु शकतो याची देखील माहिती देण्यात आली आहे.

भारतामध्ये यंदा दुष्काळ पडला आहे, अनेक राज्यांमध्ये यावर्षी पुरेसा पाऊसच झाला नाही. पावसामध्ये प्रचंड प्रमाणात तूट निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात तर जून जुलैनंतर पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. निदान परतीचा पाऊस तरी पडेल, खरीप हंगाम गेला पण रब्बी हंगामामध्ये तरी थोडंफार पीक पाणी येईल, या आशेवर शेतकरी होते. परंतु त्यातच आता जागतिक हवामान विभागाकडून (WMO) एल नीनो संदर्भात पुन्हा एकदा भारताला मोठा इशारा देण्यात आला आहे.
पुढील काळात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात एल निनोचं संकट अधिक गडद होईल, असं जागतिक हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे भारतात पुढील काही महिने अत्यंत कमी पाऊस पडणार आहे, पावसाचं प्रमाण देखील असमान असेल काही भागात पाऊस होईल तर काही भागात पाऊस होणार नाही, असं जागतिक हवामान विभागाने म्हटलं आहे. याचा मोठा फटका आता रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. जर पाऊस झाला नाही तर रब्बीची पेरणी देखील होणार नाहीये.
1950 नंतर निर्माण झालेली ही एल निनोची पहिलीच सर्वात मजबूत स्थिती आहे, असं जागतिक हवामान संघटनेचे महासचिव सेलेस्ट साउलो यांनी म्हटलं आहे. या एल निनोचा प्रभाव फेब्रुवारी 2027 पर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण सामान्य स्वरुपात राहण्याचा अंदाज आहे. समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा 1.6 अंश सेल्सिअसने वाढल्यामुळे जगावर एल निनोचं संकट निर्माण झालं आहे. दरम्यान पुढच्या वर्षी देखील फेब्रुवारी 2027 पर्यंत एल निनोचं संकट कायम राहणार आहे. मात्र त्यानंतर पाऊस सामान्य राहू शकतो, असं देखील जागतिक हवामान संघटनेनं म्हटलं आहे. दरम्यान त्यामुळे आता थोडी चिंता वाढली आहे. फेब्रुवारीपर्यंत एल निनोचं संकट कायम असल्यामुळे त्यानंतरच भारतात पावसाचं प्रमाण कसं राहणार याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.