West Bengal Assembly Election 2026 : PM मोदींच्या सभेआधी बंगालमध्ये मोठा राडा, आमदाराच्या घरावर बॉम्ब फेकला, परिस्थिती तणावपूर्ण

West Bengal Assembly Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरु आहे. त्याचवेळी राजकीय हिंसाचारही वाढला आहे. बंगालमध्ये आज जिथे मोदींची सभा होणार आहे, त्याच ठिकाणी आमदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला झाला आहे.

West Bengal Assembly Election 2026 : PM मोदींच्या सभेआधी बंगालमध्ये मोठा राडा, आमदाराच्या घरावर बॉम्ब फेकला, परिस्थिती तणावपूर्ण
West Bengal
| Updated on: Apr 27, 2026 | 9:08 AM

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. 23 एप्रिलला विधानसभेच्या 152 जागांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान झालं. आता 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जागांवर मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. बंगालमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानावेळी मागच्या काही निवडणुकांच्या तुलनेत कमी हिंसाचार झाला होता. आता दुसऱ्या टप्प्याच्यावेळी प्रचार सुरु असतानाही हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. इथे जगद्दल पोलीस स्टेशनसमोर तृणमुल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे समर्थक भिडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज परगणामध्ये जनसभा होणार आहे. त्याच्या काही तास आधी इथे हिंसाचार झाला. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी राजकीय झेंडे आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ते फाडण्यावरुन हा हिंसाचार झाला. सीआयएसएफच्या एका जवानाला गोळी लागली.

जगद्दल भागात प्रचार साहित्यावरुन भाजप आणि तृणमुल कार्यकर्ते भिडले. तृणमुलने आपल्या प्रचार साहित्याचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला. जगद्दल पोलीस स्टेशनसमोर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांच्यात तिथे आधी शाब्दीक वादावादी झाली. मग दगडफेक आणि हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली. परिस्थिती इतकी चिघळली की, स्थानिक भाजप आमदार पवन सिंह यांच्या घरावर बॉम्बफेक झाली. पवन सिंह भटपारा विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. काही लोकांनी आमदाराच्या घरावर देशी बॉम्ब फेकले. त्यामुळे आसपासच्या भागात दहशत पसरली. या बॉम्बस्फोटात तीन लोक जखमी झाले.

परिस्थिती अजूनही तणावपूर्ण

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परगनामध्ये पंतप्रधानांची रॅली होणार आहे. सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी जगद्दल आणि भटपारा भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी बॉम्बफेक आणि झडपांबाबत गुन्हे दाखल केले आहेत. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. दोन्ही बाजू परस्परांवर राजकीय बदला घेण्याच्या भावनेतून काम करत असल्याचे आरोप करत आहेत.

पहिल्या टप्प्यात 92.35 टक्के मतदान

उत्तर 24 परगणा जिल्ह्यात निवडणूक प्रचार जोरात सुरु आहे. भाजपचे दिग्गज नेते राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात 92.35 टक्के मतदान झालं. पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झालय.

 

Follow Us