TMC Party : ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का! तृणमूल पक्षाचं नाव, चिन्ह गोठवलं, निवडणूक आयोगाचा तडकाफडकी निर्णय!
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षाचे नाव गोठवले आहे.

प्रमोद जगताप, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली प्रतिनिधी : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यापासून तेथे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाच्या अनेक आमदार, खासदारांनी भाजपाची वाट धरली. खासदारांनी वेगळा गट स्थापन करून तिसऱ्याच पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला. आमदारांच्या मोठ्या गटानेही आपली वेगळी चूल मांडली. या मोठ्या धक्क्यातून सावरून ममता बॅनर्जी आपल्या पक्षात नव्याने प्राण फुंकण्याच्या प्रयत्न करत आहेत. त्या राज्यभर दौरे करत आहेत. असे असतानाच आता ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का बसला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आता तृणमूल काँग्रेस या पक्षाचे नाव तसेच निवडणूक चिन्ह गोठवले आहे. तसा निर्णय घेण्यात आला असून आता ममता बॅनर्जींना पक्षासाठी वेगळे नाव सुचवावे असे सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने नेमका काय निर्णय घेतला?
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस या पक्षाचे नाव तसेच निवडणूक चिन्ह गोठवलं आहे. ममता बॅनर्जी आणि ऋताब्रत रॉय या दोन्ही गटांना स्वतंत्र नाव व चिन्ह निवडण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. दोन्ही गटांना ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आता स्वतंत्रपणे वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आता या दोन्ही गटांना 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आपापल्या पक्षासाठी नावाचे तीन पर्याय द्यावे लागणार आहेत. तसे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उमेदवारांसाठी मुक्त चिन्हांच्या यादीतून तीन पसंतीची चिन्हे निवडता येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा परिणाम काय होणार?
तृणमूल काँग्रेस हा पक्ष पश्चिम बंगालच्या गावखेड्यापर्यंत पोहोचलेला आहे. परंतु आता हे नावच वापरता येणार नसल्याने ममता बॅनर्जी यांच्यापुढे नवे आव्हान उभे राहणार आहे. पक्षाचे चिन्हही गोठवण्यात आल्याने त्यांना आता नव्या चिन्हीची नवड करावी लागेल. पक्षाचे नाव आणि चिन्ह शेवटच्या मतदारापर्यंत घेऊन जावे लागेल. आता ममता बॅनर्जी आपल्या पक्षासाठी कोणते नाव निवडणार तसेच कोणते निवडणूक चिन्ह निवडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान हा अंतिम निर्णय नसून निवडणूक आयोगाने हा तात्पुरता निर्णय घेतला आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.