Explainer : गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू कसा झाला होता? उद्धव ठाकरेंनी काय शंका उपस्थित केली? वाचा A टू Z
आता 12 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवरुन शंका उपस्थित केली. भाषणानंतर उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी पुन्हा याच विषयावरुन प्रश्न केला. त्यावेळी माझा संशय चुकीचा असेल पण मनात खंत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

ज्ञानेश्वर लोंढेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरच्या भाषणातून एक शंका व्यक्त केली आणि पुन्हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवरुन चर्चा सुरु झाली. मुंडेंचा मृत्यू हा रहस्यमय अससल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू कसा झाला होता? त्यांच्या मृत्यूनंतर नेमकी काय शंका उपस्थित करण्यात आली? उद्धव ठाकरे भाषणात नेमकं काय म्हणाले तसेच भाजपाच्या नेत्यांनी यावर काय उत्तर दिले? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या….
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवरुन गंभीर वक्तव्य केलंय. मुंडेंचा मृत्यू हा रहस्यमय असून हे रहस्य उलगडलेलं नाही, असं ते म्हणालेत. मराठवाड्यात नेतेच ठेवायचे नाहीत, असं ठरवलेलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.
गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू कसा झाला होता?
2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे बीडच्या लोकसभा निवडणुकीत 1 लाख 36 हजार मतांनी विजयी झाले होते. गोपीनाथ मुंडेंना 6 लाख 35 हजार 995 मतं मिळाली. तर राष्ट्रवादीकडून सुरेश धस यांनी 4 लाख 99 हजार 541 मतं घेतली होती. 2014 साली भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. सगळीकडे आनंदचं वातावरण होतं.16 मे 2014 ला लोकसभेचा निकाल लागला. 26 मे रोजी मोदी सरकारचा शपथविधी झाला. ज्यात गोपीनाथ मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंडेंना ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी मिळाली होती. मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुंडे दिल्लीतच होते आणि 9 व्या दिवशी बीडला येण्यासाठी दिल्ली विमानतळावर चालले होते. त्याचवेळी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी एका इंडिका कारने मुंडेंच्या कारला धडक दिली. अपघातानंतर गोपीनाथ मुंडेंना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अंतर्गत रक्तस्राव, लिव्हरला इजा झाल्याने तसेच हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.
कोर्टात खटला सुरू
नंतर या प्रकरणाची CBI चौकशीही झाली आणि CBIनेही कोणत्याही प्रकारचा घातपात आणि राजकीय षडयंत्राचा संशय पूर्णपणे फेटाळला. हा फक्त रस्त्यावरील अपघात होता असा निष्कर्ष CBIने काढला. तर इंडिका कारचा चालक गुरविंदर सिंहला निष्काळजीपणे आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्या प्रकरणी अटक झाली. सध्या कोर्टात हा खटला सुरु असून सध्या गुरविंदर सिंह जामिनावर बाहेर आहे.
पण आता 12 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवरुन शंका उपस्थित केली. भाषणानंतर उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी पुन्हा याच विषयावरुन प्रश्न केला. त्यावेळी माझा संशय चुकीचा असेल पण मनात खंत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्याचसोबत अजित दादांच्याही विमान अपघातावरही बोट ठेवलं.
दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवरुन राजकारणात याआधीही उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत. आता अजित दादांच्या अपघाती निधनावरुन शंकेचा धूर पवार कुटुंबातूनच निघतोय. असे असतानाच उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने अचानक गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवरुन पुन्हा चर्चा सुरु झाली. त्यावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
