
WITT 2025: टीव्ही 9 नेटवर्कचा वार्षिक कार्यक्रम WITT ग्लोबल समिटमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. या कार्यक्रमात उद्योग, राजकारण, बॉलीवूड क्षेत्रातील दिग्गजांनी आपले विचार मांडले. WITT समिटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणात भूमिका स्पष्ट केली. नागपुरातील हिंसाचार आणि औरंगजेबाची कबर खोदण्याच्या मागणीबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपण संवेदनशील समाजात राहतो, आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. छावा चित्रपटातून सत्य समोर आले आहे.
नागपूर हिंसाचारात महाराष्ट्रातील अनेक भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले, कोणताही व्यक्ती जेव्हा वक्तव्य करतो तेव्हा तो या समाजाचा, या पक्षाचा, या धर्माचा किंवा या जातीचा आहे, असे समजू नये. आम्ही संवेदनशील समाजात राहतो. आमची उपासना पद्धती वेगवेगळ्या आहेत. आम्हाला एक-दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे.
औरंगजेबाची कबर खोदण्यावरून झालेल्या गदारोळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, औरंगजेबाने त्याच्या वडिलांना कारागृहात टाकले होते. भावाचा खून केला होता. त्याच्यात चांगुलपणा कोणी पाहिला असेल असेही नाही. पण आज मुस्लिम धर्माचे लोक औरंगजेबावर विश्वास ठेवतात, असे नाही.
इतिहासाच्या वादावर गडकरी पुढे म्हणाले, इतिहास कधीच पुसला जाऊ शकत नाही. इतिहासात जे काही सांगितले गेले, जे काही चित्रपटात सांगितले गेले ते सत्य होते. आपली संस्कृतीही अशी आहे की, प्रत्येक वेळी आपणास रामायण आणि महाभारतातून आपले वर्तन कसे असावे त्याचा संदेश मिळाला आहे. प्रभू राम यांनी ज्या व्यक्तीशी युद्ध केले त्याला पराभूत केले, त्यानंतर त्या रावणबाबत आणि लंकेतील लोकांबाबत त्यांची वागणूक कशी होती? त्याचप्रमाणे महाभारतातील विजयानंतर भगवान श्रीकृष्ण आणि पांडव इतर लोकांशी कसे वागले? हीच आपली संस्कृती आहे.
गडकरी म्हणाले, मला असे वाटते की या गोष्टींमधून वाद निर्माण करण्याऐवजी सध्याच्या काळात जुन्या इतिहासातून थोडी प्रेरणा घेतली पाहिजे. तो इतिहास आपणास नक्कीच प्रेरणादायी आहे. पण आता माझ्या मते त्यावरून वाद घालणे आणि भांडणे करणे योग्य नाही.