देशाशी गद्दारी केल्यावर काय शिक्षा मिळते? यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं पुढे काय होणार, वाचा
हरियाणाच्या हिसार येथील रहिवासी असलेली प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता तिचं पुढं काय होणार? जाणून घ्या...

हिसार येथील रहिवासी आणि यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध आधिकारिक गोपनीयता अधिनियम (ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1923) च्या कलम तीन आणि चार अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांचा अर्थ काय आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच ज्योतीचा गुन्हा सिद्ध झाला तर तिला किती शिक्षा होऊ शकते? असेही विचारले जात आहे.
ISI साठी हेरगिरी, नंतर अटक आणि 5 दिवसांची कोठडी
ज्योती मल्होत्रा 33 वर्षांची आहे. ती यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ओळखली जाते. ट्रॅव्हल ब्लॉगच्या बहाण्याने ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी करत होती. ISI सोबत भारताची संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली तिला 17 मे 2025 रोजी अटक करण्यात आली. हिसार पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले. त्यानंतर तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाचा: पाकिस्तानी एजंट ज्योती मल्होत्रा महिन्याला किती पैसे कमावयची?
कोणत्या कायद्यांतर्गत अटक झाली?
ज्योती मल्होत्राला ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1923 अंतर्गत अटक करण्यात आली आहे, तो एक अतिशय जुना कायदा आहे. या कायद्याचा इतिहास ब्रिटिश राजवटीपासून सुरू होतो. पूर्वी हा कायदा इंडियन ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट (अॅक्ट XIV)-1889 या नावाने ओळखला जायचा. त्या काळात भारतीय क्रांतिकार्यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या वृत्तपत्रांवर हा कायदा लागू केला जायचा. त्या काळात जे वृत्तपत्र ब्रिटिश राजवटीविरुद्ध बोलायचे, त्यांच्यावर या कायद्यांतर्गत कारवाई केली जायची. या कायद्याद्वारे त्यांचे तोंड बंद केले जायचे.
काळानुसार या कायद्यात बदल करण्यात आले आणि ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1904 अस्तित्वात आला. पुढे काही वर्षांनंतर 1923 मध्ये या कायद्यात आणखी काही बदल करण्यात आले आणि ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1904 अधिसूचित करण्यात आला.
ज्योतीला इतकी शिक्षा होऊ शकते
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी दुबे यांच्या मते, ज्योतीविरुद्ध ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट-1904 च्या कलम 3 आणि 5 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 3चा वापर त्या व्यक्तींविरुद्ध केला जातो ज्यांच्यावर पूर्णपणे हेरगिरीचा आरोप आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही कारणास्तव अशा ठिकाणी गेली, जिथे जाण्यास मनाई आहे किंवा जिथे जाण्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो, अशा वेळी हा कायदा लागू केला जातो. याशिवाय, जर कोणी व्यक्ती असे स्केच किंवा मॉडेल तयार केले जे शत्रूला कोणत्याही प्रकारे फायदा पोहोचवू शकेल, किंवा कोणताही गुप्त कोड व पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर केला, तर त्याच्यावरही कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.