Operation Sindoor : भारताने आतापर्यंत झालेल्या ऑपरेशन सिंदूरमधून काय मिळवलं? जाणून घ्या सर्वकाही

भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर राबवून चांगलाच धडा शिकवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. तेव्हापासून आतापर्यंत भारताने काय मिळवलं ते जाणून घ्या सविस्तर

Operation Sindoor : भारताने आतापर्यंत झालेल्या ऑपरेशन सिंदूरमधून काय मिळवलं? जाणून घ्या सर्वकाही
ऑपरेशन सिंदूर
Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 13, 2025 | 7:32 PM

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये गेलेल्या 26 निष्पाप नागरिकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला. धर्म विचारून पत्नींसमोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी जोर धरत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवाद्यांना धडा शिकवला जाईल असं जाहीरपणे सांगितलं होतं. तेव्हापासून भारतीय सैन्य दल आणि सरकार यांच्यात जोर बैठका होत होत्या. प्रत्येक घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष होतं. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे मिशन आखलं गेलं. या अंतर्गत भारताने 7 मे 2025 रोजी मध्यरात्री पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष केलं आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण 9 ठिकाणांवर स्ट्राईक केला. त्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताने प्रत्येक हल्ला परतवून लावला. तसेच पाकिस्तानचं रडार, एअर बेस आणि सैन्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी स्ट्राईक करून त्यांना कमकुवत केलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने बऱ्याच गोष्टी मिळवल्या आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त : भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने अचूक कारवाई करत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सीमेपार पाकिस्तानच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले : ऑपरेशन सिंदूर राबवताना पाकिस्तानात दहशतवादी सुरक्षित असलेल्या ठिकाणांवर हल्ले चढवले. यात पंजाब प्रांत आणि बहावलपूर यांचा समावेश आहे. यातून भारताने थेट संदेश दिला की पाकिस्तानच्या भूमीत कुठूनही दहशतवादाला खतपाणी घातलं जात असेल त्यांना सोडणार नाही.

भारताचं दहशतवादाविरोधात कठोर धोरण : भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादाविरोधात कठोर धोरण आखलं आहे. जर पाकिस्तानसाठी दहशतवाद ही पॉलिसी असेल तर त्याला चोख उत्तर दिलं जाईल. यातून बचावात्मक भूमिकेपेक्षा भारताने थेट कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांना सारखीच शिक्षा : दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना वेगळं पाहीलं जाणार नाही. या दोघांना त्यासाठी दोषी धरलं आणि कारवाई केली जाईल. भारताने पाकिस्तान दहशतवादाला कशी साथ देत आहे दाखवून दिलं.

पाकिस्तानची हवाई यंत्रणा कमकुवत : भारताने पाकिस्तानमधील एअर डिफेंस कमकुवत असल्याचं दाखवून दिलं आहे. भारताने पाकिस्तानचं एअर डिफेंस सिस्टम बंद पाडलं. तसेच 23 मिनिटात भारताने पाकिस्तानची संरक्षण प्रणाली कमकुवत केली. त्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर आली.

भारताची हवाई संरक्षण यंत्रणेची क्षमता : पाकिस्तानने केलेले प्रत्येक हल्ल्याला हवाई संरक्षण यंत्रणेने चोख उत्तर दिलं. त्यामुळे पाकिस्तानची हतबलता दिसून आली. प्रत्येक हल्ला हवेतच विरून गेला. ड्रोन आणि मिसाईल हवेतच पाडले.

भारताची कारवाई फक्त दहशतवादाविरोधात : भारताने पाकिस्तानवर हल्ले करताना नागरी भाग आणि दहशतवादी तळ नसलेल्या जागा टाळल्या. यातून भारताने हा लढा फक्त दहशतवादाविरोधात असल्याचं दाखवून दिलं.

भारताच्या कारवाईत दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचा खात्मा : भारताने दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. यात 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात अनेक म्होरक्यांचा समावेश होता. यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रऊफ, मुदास्सिर अहमद यासारख्या दहशतवादी कमांडरचा मृत्यू झाला. या दहशतवाद्यांनी IC-814 विमान अपहरण आणि पुलवामा ब्लास्टमध्ये कट रचला होता.

एअरस्ट्राईक करत पाकिस्तानचे एअरबेस केले उद्ध्वस्त: भारताने 9 आणि 10 मे 2025 रोजी हल्ले करत एकाच कारवाईत अण्वस्त्रधारी राष्ट्राचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तान हवाई दल 20 टक्के कमकुवत करून टाकलं. तसेच प्रमुख लढाऊ विमानं नष्ट केली. भूलारी एअरबेसवर मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात स्क्वॉड्रन लीडरचा मृत्यू देखील झाला.

भारताच्या तिन्ही दलांची एकत्रित कारवाई : भारताचं सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाने दहशतवादाविरोधात एकत्रित कारवाई केली. यात तिन्ही दलांचा संवाद दिसून आला. यातून भारताच्या तिन्ही दलाची ताकद जगाला दिसून आली.

परवानगीची गरज नाही: दहशतवादाविरोधात लढा देताना कोणाच्या परवानगीची गरज नसल्याचं भारताने दाखवून दिलं आहे. दहशतवादी आणि त्यांचे म्होरक्यांना शोधून मारलं जाईल. तसेच भारत पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याचं उत्तर देईल.

भारताला जगभरातून पाठिंबा : भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईला जगभरातील नेत्यांचा पाठिंबा मिळाला. यामुळे भारताची जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला : ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद आणि काश्मीर हे दोन्ही मुद्दे वेगळे असल्याचं दाखवून दिलं. पहिल्यांदाच भारताची कृती पूर्णपणे बाह्य दृष्टिकोनातून पाहिली गेली.